स्वप्नील गाडे, प्रतिनिधी
मुंबई, २४ जून : दक्षिण मुंबईतील गावदेवी पोलिसांनी मोबाईल चोरीच्या प्रकरणाचा तपास करत मोठी कारवाई केली असून, चोरीच्या मोबाईलची खरेदी-विक्री करणाऱ्या आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४२ मोबाईल फोन जप्त केले असून त्यांची किंमत सुमारे ७ लाख २० हजार रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे एकूण ७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास जेठालाल छेडा (वय ५६) यांच्या भुलाभाई देसाई रोड परिसरातील मोबाईल दुकानातून १० जून २०२६ रोजी सकाळी १०.३० ते १०.५० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने तीन सॅमसंग कंपनीचे वापरलेले मोबाईल चोरून नेले होते. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचा तपास सुरू असताना गावदेवी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान पोलिसांनी मोहमद अली सय्यद याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
यानंतर आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीच्या मोबाईलची खरेदी-विक्री करणाऱ्या आणखी चार जणांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये,
•वाझिरा नयुम कुरेशी (वय ३१)
•आमिर रईस कुरेशी (वय २८)
•कासीम मकसूद खान (वय २८)
•झाकीर खान (वय २८)
यांचा समावेश आहे.
पोलिसांनी या आरोपींकडून चोरीतील ३ मोबाईलसह विविध गुन्ह्यांशी संबंधित एकूण ४२ मोबाईल फोन हस्तगत केले. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत ७ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची पडताळणी केल्यानंतर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या ७ मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्यामुळे अनेक तक्रारदारांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त राज्यश्री आर., सहाय्यक पोलीस आयुक्त सुमन वेहाळण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय लोंढे , पोलीस निरीक्षक राजीव पाटील आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक मदतीच्या सहाय्याने ही यशस्वी कारवाई केली.
मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गावदेवी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चोरीच्या मालाची खरेदी-विक्री करणाऱ्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


