मुंबई प्रतिनिधी
मतदार यादी विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेच्या कामामुळे शिक्षकांवर वाढलेल्या तणावाचे गंभीर पडसाद आता समोर येऊ लागले आहेत. मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका खासगी अनुदानित शाळेतील शिक्षिकेने एसआयआरच्या कामाचा मानसिक ताण असह्य झाल्याचा आरोप करत शाळेतच झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या अतिरिक्त प्रशासकीय जबाबदाऱ्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
घाटकोपरमधील असल्फा परिसरातील श्री साईनाथ शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या उमा महेश त्रिलोटकर (नाव वृत्तसंस्थेनुसार) यांनी सोमवारी दुपारी शाळेतच झोपेच्या आठ गोळ्या घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर सहकारी शिक्षकांनी त्यांना तातडीने विक्रोळी येथील गोदरेज रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
‘मला हे काम शक्य नाही’, प्रशासनाला वारंवार विनंती
मिळालेल्या माहितीनुसार, उमा त्रिलोटकर या गेली २३ वर्षे खासगी अनुदानित शाळेत अध्यापनाचे काम करत आहेत. त्यांना एसआयआर मोहिमेसाठी बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या पतीची प्रकृती गंभीर असल्याने आणि घरातील जबाबदाऱ्या वाढल्यामुळे हे अतिरिक्त काम करणे शक्य नसल्याचे त्यांनी अनेकदा संबंधित प्रशासनाला कळविले होते.
तरीही त्यांच्या विनंतीची दखल घेतली गेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. याच वाढत्या मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
रात्री उशिरापर्यंत फोन, संदेश; एफआयआरची धमकी?
शिक्षिकेच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, नियमित शालेय कामकाज सांभाळतानाच एसआयआर मोहिमेचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात होता. रात्री उशिरापर्यंत फोन कॉल, संदेश, काम पूर्ण न झाल्यास एफआयआर दाखल करण्याच्या धमक्या आणि वरिष्ठांकडून होणारा मानसिक ताण यामुळे त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या होत्या.
शिक्षिकेचे पती म्हणाले की, “सकाळपासूनच त्या मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होत्या. माझी प्रकृतीही ठीक नसल्याने त्यांना माझी काळजी घ्यावी लागत होती. त्यातच एसआयआरच्या कामाचा वाढता दबाव होता. सुट्टीची मागणी करूनही त्यांना दिलासा मिळाला नाही.”
‘गंभीर परिस्थितीतील शिक्षकांना सूट द्यावी’
उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यापूर्वी गंभीर आजार, कौटुंबिक संकट किंवा विशेष परिस्थितीतील शिक्षकांना काही काळ अशा मोहिमेच्या कामातून वगळण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले जाते. मात्र, संबंधित शिक्षिकेच्या बाबतीत त्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झाली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘शिक्षक संघटनांमध्ये संताप’
या घटनेनंतर शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शैक्षणिक जबाबदाऱ्यांबरोबरच निवडणूक, जनगणना, सर्वेक्षण आणि विविध शासकीय मोहिमांची अतिरिक्त कामे शिक्षकांवर टाकली जात असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेण्याची आणि मानसिक तणावाखाली काम करणाऱ्या शिक्षकांना तातडीने दिलासा देण्याची मागणी होत आहे.
“प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया प्रतीक्षेत”
दरम्यान, या प्रकरणी संबंधित निवडणूक प्रशासन किंवा शिक्षण विभागाकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. शिक्षिकेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.


