नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांचे वितरण मंगळवारी (23 जून) नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 65 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
राष्ट्रपती भवनातील रिपब्लिक पॅव्हेलियनमध्ये आयोजित या विशेष समारंभात दोन पद्मविभूषण, सात पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. कला, साहित्य, विज्ञान, वैद्यकीय सेवा, क्रीडा, समाजसेवा आणि लोकसेवा अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना त्यांच्या असामान्य कार्याची दखल घेत हा गौरव देण्यात आला.
क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवल्या असून जागतिक क्रिकेटमध्ये त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
याचबरोबर भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार सविता पुनीयायांनाही पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय महिला हॉकीला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
महाराष्ट्रातील मान्यवरांचाही गौरव
या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींनाही पद्म पुरस्कारांनी गौरविण्यात आले. समाजकारण, लोककला आणि सांस्कृतिक जतनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अर्मिडा फर्नांडिस आणि भिकल्या लाडक्या धिंडा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतल्याने महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
विजय अमृतराज यांना पद्मभूषण
भारतीय टेनिस क्षेत्रातील दिग्गज विजय अमुर्तराज यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. खेळाडू म्हणूनच नव्हे तर सामाजिक आणि मानवतावादी कार्यासाठीही त्यांचे योगदान मोठे मानले जाते.
न्याय, साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थाँमस यांना लोकसेवेतील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर मल्याळम पत्रकार पी. नारायण यांना साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषणने गौरविण्यात आले.
अमेरिकेत कार्यरत असलेले प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ दत्तात्रेयुडू नोरी यांनाही सन्मानित करण्यात आले. आरोग्यसेवा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची देशभरात दखल घेतली जाते.
अलका याज्ञिक, ममूटी यांची उपस्थिती
या सोहळ्यात सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक, ज्येष्ठ अभिनेते ममुटी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्याला त्यांच्या उपस्थितीमुळे विशेष आकर्षण लाभले.
कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी अभिनेते आर. माधवन यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभागामुळे त्यांचे नाव चर्चेत असते.
विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांच्या भावाने हा सन्मान स्वीकारला.
भारतीय संस्कृती, भाषा आणि संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्राध्यापिका ल्युडमिला खोखलोवा (यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सीमांचल पात्रा आणि नागालँडचे पोंगनार यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. पोंगनार यांची पारंपरिक नागा वेशभूषा सोहळ्यात विशेष चर्चेचा विषय ठरली.
समाजसेवेतील कार्यालाही मान्यता
मध्य प्रदेशातील समाजसेवक मोहन नगर यांना समाजसेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. ग्रामीण आणि वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली.
यापूर्वीही 66 जणांचा झाला होता गौरव
याआधी 25 मे रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान केले होते. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांच्या वतीने अभिनेत्री आणि खासदर हेमामालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला होता. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
देशाच्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव
पद्म पुरस्कार हे देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात क्रीडा, कला, साहित्य, वैद्यकीय सेवा, समाजकारण आणि लोकसेवा क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करून देशाने त्यांच्या योगदानाला सलाम केला. राष्ट्रपती भवनातील हा सोहळा देशाच्या प्रतिभावंत आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानाचा अविस्मरणीय क्षण ठरला.


