लखनऊ :
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे तीन मजली व्यावसायिक इमारतीतील अॅनिमेशन प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत १२ तरुण आणि तीन तरुणींचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, आगीच्या ज्वाळा आणि धुरापासून बचाव करण्यासाठी इमारतीवरून उडी मारणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ते सध्या धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. घटनेचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, त्यामध्ये एक विद्यार्थी खिडकीच्या ग्रीलला धरून जीव वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. काही क्षणांनी तो खाली कोसळल्याचेही दृश्य व्हिडीओमध्ये आहे.
उडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (केजीएमयू) ट्रॉमा सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेम राज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीवरून उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याच्या कंबरेला आणि माकडहाडाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दुखापतीचे नेमके स्वरूप समजण्यासाठी सीटी स्कॅन आणि एक्स-रे तपासण्या करण्यात येत आहेत.
ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, आगीतून बचावासाठी एकूण दोन विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उडी मारली होती. दोघांच्या पाठ आणि कंबरेला दुखापत झाली असून तपासणीनंतर पुढील उपचार केले जात आहेत.
२१ ते २२ जण रुग्णालयात दाखल
रुग्णालय प्रशासनाने अद्याप मृतांचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नसला, तरी डॉक्टरांच्या माहितीनुसार आतापर्यंत २१ ते २२ जणांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी १५ जणांना मृत घोषित करण्यात आले. मृतांच्या शवविच्छेदनापूर्वी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.
दुर्घटनेतून बचावलेल्या पाच ते सहा विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यापैकी एक मुलगा पाठीच्या दुखापतीमुळे आणि एक मुलगी पायाला झालेल्या दुखापतीमुळे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. उर्वरित चार विद्यार्थी शुद्धीवर असून त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेमुळे लखनऊ शहरात शोककळा पसरली असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.


