लखनऊ:
मुलायम सिंग यादव यांचे धाकटे पुत्र आणि अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचे बुधवारी पहाटे दुःखद निधन झाले. अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवल्याने उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून लखनऊ शहरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना बुधवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास लखनऊ येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले.
प्रतीक यादव यांच्या मृत्यूमागे हृदयविकाराचा तीव्र झटका किंवा ब्रेन हॅमरेज कारणीभूत असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी चार डॉक्टरांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून प्रतीक यादव यांना अस्वस्थ वाटत होते. काही दिवसांपूर्वीही त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे अचानक प्रकृती अधिक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रतीक यादव हे मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. राजकारणापासून काहीसे दूर राहून ते व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांची पत्नी अपर्णा यादव या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या असून सध्या उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यादव कुटुंबातील या दुःखद घटनेमुळे समाजवादी पक्षासह विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, प्रतीक यादव यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर लखनऊतील त्यांच्या निवासस्थानी समर्थक आणि नातेवाईकांची गर्दी होऊ लागली आहे. अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते यादव कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचत आहेत.


