सातारा प्रतिनिधी
सातार्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, गोडोली नाक्यावरील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पोवई नाका ते अजिंठा चौक दरम्यान उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. तसेच करंजे नाका परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंडरपास अथवा उड्डाणपूल उभारण्याच्या पर्यायांचाही गांभीर्याने विचार सुरू करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव, उपअभियंता रवींद्र आंबेकर, शाखा अभियंता रूपेश नरवर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सातार्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे १० कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सातार्याच्या ओळखीला साजेशी भव्य वास्तू उभारली जाणार आहे. या इमारतीच्या आराखड्यासाठी वास्तुविशारदांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातून निवडलेल्या संकल्पनेनुसार आधुनिक सुविधा आणि प्रशासकीय गरजांचा विचार करून इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे.
दरम्यान, शहरातील प्रमुख वाहतूक केंद्रांपैकी एक असलेल्या गोडोली नाक्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होत असल्याने वारंवार कोंडीची समस्या निर्माण होते. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे आणि ग्रामीण भागातून होणाऱ्या वाहनांच्या आवागमनामुळे या मार्गावरील ताण अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोवई नाका-गोडोली नाका-अजिंठा चौक या महत्त्वाच्या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव बैठकीत चर्चिला गेला. या प्रस्तावाबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल आणि आराखडा तातडीने सादर करण्याचे आदेश शिवेंद्रराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
याशिवाय करंजे नाका परिसरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांच्या घटनांवरही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. करंजे नाका ते म्हसवे रोड या मार्गावर वाहनांची मोठी रहदारी होत असल्याने तेथे अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय तपासण्यात येणार आहे. यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्याय निश्चित करावा आणि त्याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही भोसले यांनी दिले.
सातार्याच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि प्रशासकीय सुविधांचा विस्तार यासाठी ही कामे महत्त्वाची ठरणार असून, त्यातून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.


