कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या शुक्रवार (१९ जून) आणि शनिवार (२० जून) रोजी दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी आणि दौऱ्याच्या सुरळीत आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि कोल्हापूर महापालिकेने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांची दुरुस्ती, स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, सुरक्षा व्यवस्थेची उभारणी आणि विविध नागरी सुविधांची पाहणी याला वेग आला आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा केवळ राजकीयदृष्ट्याच नव्हे, तर प्रशासकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात असल्याने शहरातील सर्व प्रमुख विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांकडून कामांचा आढावा घेतला जात असून नियोजनबद्ध पद्धतीने तयारी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
दौऱ्यादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, त्या मार्गांवरील रस्त्यांची डागडुजी आणि पॅचवर्कची कामे तातडीने पूर्ण करण्यात येत आहेत. सर्किट हाऊस, शाहू टोल नाका, धैर्यप्रसाद चौक, खानविलकर पेट्रोल पंप परिसर तसेच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील रस्त्यांची विशेष दुरुस्ती करण्यात येत आहे. याशिवाय रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, ड्रेनेज व्यवस्थेची साफसफाई, डीप क्लिनिंग आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत.
शहरातील सौंदर्यीकरण आणि वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवरही प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. महालक्ष्मी मंदिर परिसर, विद्यापीठ प्रवेशद्वार, भवानी मंदिर चौक, शहाजी कॉलेज ते दसरा चौक आणि केएसबीपी चौक मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. दौऱ्याच्या मार्गावरील सर्व खोदकामे तातडीने पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीनेही व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. गृहमंत्र्यांच्या ताफ्याच्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येत असून पोलीस यंत्रणेकडून सुरक्षा आराखडा अंतिम करण्यात येत आहे. भटकी जनावरे आणि कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून आवश्यक ठिकाणी मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यात येत आहे. अग्निशमन विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शहरातील पोलीस परेड ग्राऊंडवर अमित शहा यांच्या प्रमुख सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सभेदरम्यान गृहमंत्री शहा यांचा नागरी सत्कारही करण्यात येणार असून त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मंडप, बैठक व्यवस्था, ध्वनीप्रणाली आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील या दौऱ्याला आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले असून प्रशासनाकडून कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधला जात आहे. शहरात सुरू असलेल्या कामांमुळे आगामी दोन दिवस कोल्हापूरचे लक्ष केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लागले आहे.


