रणजित मस्के, प्रतिनिधी
बार्शी : घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या काही वेळात शोध घेत तिला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे चिंतेत असलेल्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बार्शी शहरातील मांगडे चाळ परिसरात राहणारी रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे ही चार वर्षीय मुलगी सकाळी सुमारे सातच्या सुमारास घरातील कोणालाही न सांगता बाहेर पडली होती. बराच वेळ मुलगी दिसून न आल्याने तिचे वडील बाबासाहेब दगड्डु मांगडे यांनी तातडीने बार्शी शहर पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची माहिती दिली आणि शोध घेण्याची विनंती केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. परिसरातील विविध ठिकाणी तपासणी करत असताना टिळक चौक परिसरात सदर चिमुकली सुखरूप आढळून आली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि तिच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत विचारपूस करण्यात आली.
यावेळी चिमुकलीने खेळणे घेण्यासाठी घरातून बाहेर पडल्याचे सांगितले. मुलगी पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून पोलिसांनी तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. मुलगी सुखरूप परत मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी बार्शी शहर पोलिसांचे आभार मानले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संगप्पा मुळे तसेच पोलीस शिपाई राहुल बोंदर आणि संतोष जाधवर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
बार्शी शहर पोलिसांच्या तातडीच्या प्रतिसादामुळे हरवलेली चिमुकली अल्पावधीतच शोधून काढण्यात यश आले आणि संभाव्य अनर्थ टळला.


