कराड प्रतिनिधी
कराड : देशसेवेत वीरमरण आलेले जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यातील शहापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दल व पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
अंत्यसंस्कारावेळी आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओमकार कापले, गटशिक्षणाधिकारी प्रताप पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शहीद अर्जुन जाधव यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यानंतर वीरपत्नी सायली जाधव, मुलगा सर्वेश, वडील राजेंद्र जाधव, आई सुरेखा जाधव, भाऊ ऋषिकेश जाधव तसेच बहिणी रेश्मा चव्हाण आणि पूनम पाटील यांनी शहीद जवानाचे अखेरचे दर्शन घेतले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला.
या वेळी लष्करातील आजी-माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या भावनिक वातावरणात शहीद जवानाला अखेरचा निरोप दिला. देशासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.


