मुंबई प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्यावरील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा आणि रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. रायगडाच्या संवर्धनासोबतच पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी व्यापक आणि समन्वित आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती सहभागी झाले होते. याशिवाय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत आणि महेश वाव्हळ, पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे तसेच रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या संवर्धन आणि विकासकामांची माहिती अधिकाऱ्यांनी सादर केली. शिरकाई मंदिर, महादरवाजा आणि वाघ दरवाज्याच्या जतन व दुरुस्तीची कामे सध्या सुरू असून राणी वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगण्यात आले. तसेच हत्ती तलाव आणि फुटका तलाव परिसरातील गाळ काढणे, गळती रोखणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याची कामेही वेगाने सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
रायगडावरील स्वच्छतागृहे, त्यांची देखभाल, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणींवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. वाढत्या पर्यटकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुविधा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री शेलार यांनी नमूद केले.
यावेळी ॲड. शेलार यांनी पुरातत्त्व विभाग, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुस्थितीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. संयुक्त पाहणीनंतर मंत्रालयात पुन्हा उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असून रायगड विकास प्राधिकरणाची स्वायत्तता, निधीची उपलब्धता, देखभाल यंत्रणा, पर्यटक सुविधा आणि विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांवर व्यापक चर्चा करून पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रायगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मंत्री शेलार यांनी यावेळी केला.


