कोल्हापूर प्रतिनिधी
पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने मदतीसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहावे, या व्यापक सामाजिक उद्देशातून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. सामाजिक न्याय, समावेशकता आणि मानवतेचा वारसा जपणाऱ्या शाहू महाराजांच्या भूमीत आता देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार होत असून, ही टीम आगामी पूरस्थितीत बचावकार्य करण्यासाठी सज्ज झाली आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्या उपस्थितीत राजाराम तलाव परिसरात तृतीयपंथीयांसाठी विशेष पूर व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘मैत्री’ तृतीयपंथीय संघटनेच्या सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली.
दोन दिवस चाललेल्या या विशेष प्रशिक्षण शिबिरात तृतीयपंथीय सदस्यांना आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. मोटरबोट चालविणे, पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना वाचविण्याच्या तंत्रांचा वापर, प्रथमोपचार, आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरती बोट तयार करणे, बचाव पथकाचे समन्वय व्यवस्थापन अशा अनेक महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
विशेष म्हणजे, केवळ प्रशिक्षणापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता आगामी पावसाळ्यात प्रत्यक्ष पूरस्थितीत या टीमची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरवर्षी पंचगंगा नदीसह विविध भागांमध्ये निर्माण होणाऱ्या पूरस्थितीत बचावकार्य, मदत केंद्रांचे व्यवस्थापन, नागरिकांचे स्थलांतर आणि आपत्कालीन सहाय्य अशा जबाबदाऱ्या ही टीम पार पाडणार आहे.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दूर ठेवण्यात आलेल्या तृतीयपंथीय समाजाला प्रशासनाने दिलेली ही जबाबदारी सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण उदाहरण मानली जात आहे. “तृतीयपंथीय व्यक्तींनाही समाजासाठी योगदान देण्याची संधी मिळाली पाहिजे,” अशी भावना या उपक्रमातून व्यक्त होत असून, राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
कोल्हापूरच्या या उपक्रमामुळे तृतीयपंथीय समाजाबाबतचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे करणारी ही टीम केवळ बचावकार्य करणार नाही, तर सामाजिक समतेचा आणि मानवतेचा संदेशही देणार असल्याचे बोलले जात आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापुराने पुन्हा एकदा सामाजिक परिवर्तनाचा आदर्श देशासमोर ठेवला असून, आता ही तृतीयपंथीय आपत्ती व्यवस्थापन टीम देशासाठी प्रेरणादायी मॉडेल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


