नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशाच्या संसदीय लोकशाहीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार’ यंदा महाराष्ट्रासाठी विशेष ठरला आहे. 2026 च्या संसद रत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून देशभरातून निवड झालेल्या 12 खासदारांपैकी तब्बल पाच खासदार महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे संसदेतील प्रभावी उपस्थिती, चर्चांमधील सहभाग आणि विविध विषयांवरील सक्रिय भूमिका यामुळे महाराष्ट्राच्या खासदारांनी यंदा दिल्लीत आपला ठसा उमटविल्याचे मानले जात आहे.
चेन्नईस्थित प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिनतर्फे दरवर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. संसदेतील प्रश्नोत्तरे, चर्चांतील सहभाग, समित्यांमधील कार्य, खासगी विधेयके, जनहिताचे मुद्दे आणि संसदीय शिस्त यांसारख्या विविध निकषांच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाते.
यंदाच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून शिवसेनेच्या (शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के, भाजपच्या डॉ. हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि डॉ. मेधा कुलकर्णी यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे नरेश म्हस्के, स्मिता वाघ आणि मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संसदीय कामकाजात सातत्यपूर्ण सक्रियता आणि प्रभावी योगदानाची ही दखल मानली जात आहे.
दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यंदा पुरस्कार मिळालेला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आतापर्यंत तब्बल आठ वेळा संसद रत्न पुरस्कार पटकावणाऱ्या सुळे या या पुरस्काराच्या नियमित मानकरी राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा यादीत अभाव अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
संसद रत्न पुरस्कारांचा 16 वा सोहळा जुलै 2026 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा सोहळा विशेष महत्त्वाचा मानला जात असून यावेळी 150 वा संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांची घोषणा संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल आणि प्राईम पॉईंट फाउंडेशनचे संस्थापक श्रीनिवासन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
प्रियदर्शनी राहुल यांनी सांगितले की, “संसद रत्न पुरस्कार 2026 साठी परीक्षक समितीने 10 लोकसभा खासदार, 2 राज्यसभा खासदार आणि 4 संसदीय स्थायी समित्यांची निवड केली आहे. बजेट अधिवेशन 2026 अखेरपर्यंतच्या कामगिरीचा सखोल अभ्यास करून विविध श्रेणींमध्ये ही निवड करण्यात आली आहे. संसदीय लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी उत्कृष्ट संसदीय कार्याचा गौरव करणे हा या पुरस्कारामागील उद्देश आहे.”
देशभरातील निवड झालेल्या खासदारांमध्ये उत्तर प्रदेशचे जगदंबिका पाल आणि प्रवीण पटेल, राजस्थानचे पी. पी. चौधरी आणि लुंबाराम चौधरी, झारखंडचे निशिकांत दुबे आणि विद्युत बरन महतो यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैयक्तिक श्रेणीत विशेष निवड करण्यात आली आहे. संसदेत विविध विषयांवर सातत्याने भूमिका मांडणे, समित्यांमधील सहभाग आणि मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्यांची दखल घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, चार संसदीय स्थायी समित्यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संसदीय समित्यांचे कामकाज हे लोकशाहीतील धोरणात्मक प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग मानले जाते. विविध मंत्रालयांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, विधेयकांचा अभ्यास करणे आणि सरकारला सूचना करणे अशा जबाबदाऱ्या या समित्या पार पाडतात.
प्राईम पॉईंट फाउंडेशनने नुकताच आपला 25 वा वर्धापन दिन साजरा केला आहे. या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून संसदेतील सकारात्मक आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीचा गौरव केला जातो. निवड प्रक्रिया पूर्णपणे आकडेवारीवर आधारित असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे. पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च, लोकसभा सचिवालय आणि राज्यसभा सचिवालय यांच्याकडून उपलब्ध झालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, महाराष्ट्रातील खासदारांची मोठ्या प्रमाणावर झालेली निवड ही केवळ संख्यात्मक बाब नसून संसदेत राज्याच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक आहे. आगामी काळात राज्यातील राजकीय पक्ष या गौरवाचा राजकीय भांडवल म्हणूनही वापर करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


