नवी मुंबई प्रतिनिधी
उन्हाळ्याची तीव्रता, वाढते बाष्पीभवन आणि ‘एल-निनो’ तसेच ‘आयओडी’च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना आता पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने येत्या सोमवारपासून (२५ मे) शहरात अधिकृतपणे १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असून, शहरातील विविध विभागांमध्ये आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
मुख्य जलस्रोत असलेल्या मोरबे धरणातील पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटल्याने प्रशासनाने ही खबरदारीची पावले उचलली आहेत. पालिकेच्या या निर्णयाचा परिणाम नवी मुंबईसह सिडकोच्या खारघर आणि कामोठे या नोड्सवरही होणार आहे. त्यामुळे आगामी काही आठवडे नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र, सध्या धरणात केवळ ३६.४७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच अवघा १९.११ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून काही आठवडे बाकी असताना हा साठा पुढील काळासाठी पुरेसा राखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यंदा अपेक्षेपेक्षा अधिक उष्णतेमुळे जलाशयातील बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, त्याचा थेट परिणाम पाणीसाठ्यावर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, अतिरिक्त शहर अभियंता (स्थापत्य) अरविंद शिंदे यांनी सांगितले की, “सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाचे आगमन आणि धरण परिसरातील पर्जन्यमान यावर पुढील नियोजन अवलंबून राहणार आहे. समाधानकारक पाऊस होईपर्यंत पाणी कपात कायम राहू शकते.”
पालिकेने नागरिकांना पाण्याचा अत्यंत जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहन धुणे, अंगण धुणे, नळ सुरू ठेवणे यांसारखा अनावश्यक वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गळतीचे नळ त्वरित दुरुस्त करणे आणि पाणी साठवताना काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
खारघर- कामोठे नोड्सनाही झळ
नवी मुंबईसोबतच मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या सिडकोच्या खारघर आणि कामोठे या भागांमध्येही कपात लागू राहणार आहे. या दोन्ही नोड्समध्ये दर शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनीही पाण्याचे नियोजन करून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विभागनिहाय पाणी कपातीचे वेळापत्रक
बेलापूर – सोमवार व गुरुवार (संध्याकाळचा पुरवठा बंद)
नेरूळ व कोपरखैरणे – मंगळवार व शनिवार (संध्याकाळचा पुरवठा बंद)
तुर्भे व घणसोली – बुधवार व रविवार (संध्याकाळचा पुरवठा बंद)
वाशी – सोमवार व गुरुवार (संध्याकाळचा पुरवठा बंद)
ऐरोली – औद्योगिक क्षेत्रातील संभाव्य शटडाऊननुसार कपात
दिघा – औद्योगिक क्षेत्रातील शटडाऊननुसार वेळापत्रक लागू
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
अचानक जाहीर झालेल्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः गृहसंकुले, व्यावसायिक संकुले आणि लहान उद्योगांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उन्हाळ्याच्या अखेरीसच पाणी कपात लागू झाल्याने आगामी जून महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मान्सून वेळेत आणि समाधानकारक झाला तर परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा प्रशासनाने व्यक्त केली असली, तरी तोपर्यंत नवी मुंबईकरांना ‘पाणी बचती’चा मंत्र अंगीकारावा लागणार आहे.


