नवी मुंबई, प्रतिनिधी
नवी मुंबईत भ्रष्टाचारविरोधी विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत अप्पर जिल्हाधिकारी तथा सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी रामदास जगताप यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली. २२ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे सिडको प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, सिडकोच्या २२.५ टक्के योजनेतील नोंदणी प्रक्रियेशी संबंधित कामासाठी तक्रारदाराकडून लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या सापळ्यात अप्पर जिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप (वय ५७) यांच्या सांगण्यावरून शिपाई हरेश सोनवणे हा लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडला. त्यानंतर जगताप यांनाही ताब्यात घेण्यात आले. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
रामदास जगताप हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाशी संबंधित सिडकोच्या भूमी व भूमापन विभागाचे प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे या अटकेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई एसीबी युनिटकडून करण्यात येत असून, आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


