सांगली प्रतिनिधी
लेझीम या पारंपरिक प्रकारात विश्वविक्रमी कामगिरीनंतर सांगली शिक्षण संस्थेने प्रजासत्ताक दिनी आणखी एक इतिहास रचला. देशाची राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात ‘कर्तव्यपथा’वर संचलनाच्या सुरवातीला सांगलीच्या सुपुत्रांनी ‘
सारे जहाँ से अच्छा’ या गीतावर लेझीमचा ठेका धरत संचलन केले.
देशवासीयांसमोर राष्ट्रगीत झाल्यानंतर परेडच्या आगमनाची सूचना देणाऱ्या संघात तब्बल ३०० जण होते. सांगली शिक्षण संस्थेत शिकलेल्या २५ मुला-मुलींचा लेझीमचा संघ अगदी सुरुवातीला ‘हेरॉल्डिंग ग्रुप’मध्ये होता. सांगलीसाठी ही खूप अभिमानाची बाब असल्याची भावना सहभागींनीव्यक्त केली.
क्रीडा भारती संस्थेच्या सहकार्याने सांगली शिक्षण संस्था आणि बलभीम व्यायाम मंडळाच्या लेझीम संघाची गेल्या महिन्यात संचलनासाठी निवड झाली होती. महाराष्ट्राचा लेझीम हा पारंपरिक खेळ ७६ वर्षांनी प्रथमच या कार्यक्रमात सादर होणार असल्याने सांगलीकरांना याची मोठी उत्सुकता होती.
सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विजयराव भिडे यांच्या प्रयत्नाने ही संधी मिळाली होती. संस्थेचे कार्यवाह शि. वा. गोसावी, अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र देवधर, प्रसाद जोग, नितीन खाडिलकर, विपिन कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना १६ माजी विद्यार्थिंनी, चार विद्यार्थी, पाच वादक असा २५ जणांचा सहभाग होता. ‘कर्तव्यपथा’वर प्रजासत्ताक संचलनात अग्रभागी स्थान मिळणे, ही संस्थेसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
१६ मुली, ४ मुले अन् ५ वादक
विद्यार्थिनी : संपदा जोशी, श्रावणी गाडगीळ, अनुश्री विसपुते, उर्वी कान्हेरे, केतकी बावडेकर, साक्षी पारेख, मृण्मयी फडके, वेदश्री दांडेकर, पूर्वा कुलकर्णी, समृद्धी बेलवलकर, आर्या जोशी, मुक्ता लिमये, साक्षी अजेटराव, अस्मिता शिंदे, संस्कृती बेलवलकर, तेजस्विनी सत्तीकर.
विद्यार्थी विनायक येडके, मिथेश माने, विवेक पाटील. वादक – मधुरा लिमये, ज्ञानेश लिमये, शंतनू ताम्हणकर, किशोर माने. संघप्रमुख – हरिहर भिडे. व्यवस्थापक – सचिन गद्रे.
सांगलीतून दिल्लीत सरावासाठी लेझीमचा संघ दोन आठवड्यांपूर्वीच रवाना झाला होता. तब्बल ११ दिवस दिल्लीत कडाक्याच्या थंडीत संघाने कसून सराव केला. विशेष म्हणजे संघातील सर्वच सदस्य संचलनासाठी पात्र ठरले. संगीत अकॅडमीच्या श्रीमती संध्या यांचे मोठे सहकार्य मिळाले. संस्थेसाठी मिळालेली ही सुवर्णसंधी होती. तिचे सोने करण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले आहे.


