मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने तिसऱ्या दिवशी निर्णायक टप्पा गाठला असून आतापर्यंत तब्बल ८५ टक्के कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. ५०० हून अधिक अनधिकृत बांधकामांपैकी ४०० पेक्षा जास्त झोपड्या आणि संरचना जमीनदोस्त करण्यात आल्या असून उर्वरित अतिक्रमणे पुढील दोन दिवसांत हटवली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. २३ मेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून त्यानंतर परिसर साफसफाई, मलबा हटविणे आणि सुरक्षा बॅरिकेडिंगची कामे केली जाणार आहेत.
मागील दोन दिवसांत दगडफेक, आंदोलन आणि पोलिसांशी झालेल्या झटापटीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गुरुवारी सकाळपासून गरीब नगर परिसरात तुलनेने शांतता होती. तरीही कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. स्कायवॉकखाली, मुख्य रस्त्यांवर तसेच कारवाई सुरू असलेल्या प्रत्येक विभागात पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे सुरक्षा कर्मचारी तैनात होते.
दिवसभर पाडकाम, रात्री मलबा हटविण्याचे काम
रेल्वे प्रशासनाने ही मोहीम दुहेरी पद्धतीने राबवली आहे. दिवसभर अतिक्रमणे हटविणे आणि रात्री मलबा साफ करण्याचे काम सुरू ठेवण्यात येत आहे. रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत पोस्ट-डिमोलिशन ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले. या कामासाठी सुमारे ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये २५० सुरक्षा विभागातील कर्मचारी सहभागी आहेत.
अनेक ठिकाणी लोखंडी पत्रे, ग्रील, काँक्रीटची मजबूत बांधकामे आणि अवजड संरचना हटवण्यासाठी गॅस कटर आणि विशेष यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. काही भागांत मध्यरात्रीपर्यंत मशीनचा आवाज सुरू होता. दुर्घटना टाळण्यासाठी अतिरिक्त प्रकाशयोजना, सुरक्षा दोर आणि आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली होती.
१३ यंत्रे आणि ४० ट्रकद्वारे मलबा हटविण्याची मोहीम
संपूर्ण कारवाईसाठी १३ जेसीबी, पोकलेन आणि अन्य अवजड यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. याशिवाय दररोज सुमारे ४० ट्रकच्या सहाय्याने ८० ते ९० मेट्रिक टन मलबा हटवला जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. परिसरात सर्वत्र धुळीचे ढग आणि पडलेल्या बांधकामांचे ढिगारे दिसून येत होते.
कारवाईदरम्यान अनेक नागरिक आपापल्या घरातील उरलेले साहित्य, भांडी, कपडे आणि घरगुती वस्तू ढिगाऱ्यातून बाहेर काढताना दिसले. काही कुटुंबांनी रस्त्याच्या कडेला तात्पुरती व्यवस्था केली असून संसार वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रभावित नागरिकांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था
अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी रेल्वेकडून काही प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, बुधवारी दोन हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच अनेकांना पॅकबंद जेवणही देण्यात आले.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात असून रेल्वे सुरक्षा क्षेत्र मोकळे करणे, भविष्यातील प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करणे आणि स्थानक परिसरातील अडथळे दूर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
पुन्हा अतिक्रमण रोखण्यासाठी विशेष सुरक्षा कवच
२३ मेनंतरही परिसरात काही दिवस मलबा हटविणे, साफसफाई आणि सीमांकनाची कामे सुरू राहणार आहेत. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संपूर्ण परिसराला लोखंडी बॅरिकेडिंग आणि सुरक्षा कुंपण घालण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त गस्तीदेखील वाढवण्यात येणार असल्याचे समजते.
इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्सचा मार्ग मोकळा
अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या जागेवर भविष्यात इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना पश्चिम रेल्वेकडून आखण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक आणि वांद्रे टर्मिनसची क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
सध्या वांद्रे टर्मिनसमधून दररोज सुमारे २२ मेल आणि एक्स्प्रेस गाड्या धावतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त प्लॅटफॉर्म, नवीन रेल्वे कार्यालये, पार्किंग सुविधा आणि प्रवासी सेवा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच एलिव्हेटेड रोड, वाहतूक सुलभीकरण आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही या जागेमुळे गती मिळणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गरीब नगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे एकीकडे रेल्वे विकास प्रकल्पांना चालना मिळत असली तरी दुसरीकडे शेकडो कुटुंबांवर विस्थापनाचे संकट कोसळल्याने मानवी प्रश्नही ऐरणीवर आला आहे.


