मुंबई प्रतिनिधी
राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने वरिष्ठ आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, मीरा-भाईंदर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस यंत्रणांमध्ये नव्या नेतृत्वाची नियुक्ती झाली आहे. एकूण ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदस्थापना करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी प्रशासकीय हालचाल सुरू झाली आहे.
गृह विभागाच्या आदेशानुसार, नागपूर शहरात अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले शिवाजी राठोड यांची बदली ठाणे शहरात अपर पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथक, पुणे येथे कार्यरत असलेले प्रवीण ढवळे यांच्याकडे आता नवी मुंबई गुन्हे शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवी मुंबई म्हणून करण्यात आली आहे.
राज्य राखीव पोलीस बलातील वरिष्ठ अधिकारी विनित साहू यांना पोलिस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती देत राज्य राखीव पोलीस बल, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे. तर राज्य राखीव पोलीस बलात कार्यरत असलेले अशोक दुबे यांची बदली अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर येथे करण्यात आली आहे. आर. राजा यांना अपर पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश विभाग, मुंबई या महत्त्वाच्या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
दुसऱ्या आदेशात अनेक जिल्हा आणि शहर पोलीस दलांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ठाणे शहरातील पोलिस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांची नियुक्ती राज्य पोलिस नियंत्रण कक्षात पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे कार्यरत असलेले संजीव कदम यांना आता दहशतवाद विरोधी पथक, पुणे येथे पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई शहरातील पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांची बदली ठाणे शहरात पोलिस उपआयुक्त म्हणून करण्यात आली आहे. ठाणे शहरातील अमरसिंग जाधव यांच्याकडे डायल-११२, नवी मुंबईचे पोलिस अधीक्षकपद सोपविण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपआयुक्त संजय सरंग पाटील यांची बदली मीरा-भाईंदर वसई-विरार येथे पोलिस उपआयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर वसई-विरार येथे कार्यरत विक्रांत देशमुख यांना पिंपरी-चिंचवड येथे पोलिस उपआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रीती टिळे यांची नियुक्ती सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई येथे करण्यात आली आहे. राज्य पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत समीर शेख यांची बदली अपर पोलिस अधीक्षक, बीड येथे झाली आहे.
मुंबई शहरातील हिमंत जाधव यांच्याकडे आता अमली पदार्थ विरोधी कार्य बल, पुणे येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सारथी सुरक्षा विभागातील रमा चौधरी यांची बदली पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागभीड-दौंड येथे करण्यात आली आहे. तर विनय राठोड यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण म्हणून करण्यात आली आहे.
गृह विभागाच्या आदेशात काही अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या बदल्या रद्द करण्यात आल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. आगामी काळात कायदा-सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण, सायबर गुन्हे तपास आणि विशेष पथकांच्या कामकाजात अधिक समन्वय आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने हे फेरबदल महत्त्वाचे मानले जात आहेत.
राज्यातील विविध शहरांमध्ये वाढते सायबर गुन्हे, संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थविरोधी मोहिमा आणि दहशतवादविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर अनुभवी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या बदल्यांमुळे अनेक संवेदनशील विभागांमध्ये नव्या कार्यपद्धती आणि प्रशासनिक बदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


