नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशाच्या वाहतूक इतिहासात नवा अध्याय लिहिणाऱ्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा अधिकृत फोटो अखेर समोर आला आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पांतर्गत धावणाऱ्या या अत्याधुनिक ट्रेनचे डिझाईन रेल्वे मंत्रालयाने सार्वजनिक केले असून, राजधानी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या गेट क्रमांक ०४ येथे हा फोटो प्रदर्शित करण्यात आला आहे. वेग, तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधांचा संगम असलेली ही ट्रेन भारताच्या रेल्वे व्यवस्थेला जागतिक दर्जाचे स्वरूप देणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे.
A picture of the country's first proposed bullet train has been displayed at the Ministry of Railways. The picture has been installed at Gate Number 4: Indian Railways pic.twitter.com/LcbwMstDuw
— ANI (@ANI) May 18, 2026
वृत्तसंस्था एएनआयने रेल्वे मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती प्रसिद्ध केली. समोर आलेल्या फोटोत ट्रेनचे आकर्षक आणि एरोडायनामिक डिझाईन स्पष्टपणे दिसून येत असून, जपानच्या शिंकान्सेन तंत्रज्ञानावर आधारित ही सेवा देशातील सर्वात वेगवान रेल्वे सेवा ठरणार आहे.
Delhi: Visuals of the country’s first proposed bullet train have been installed at Gate Number 4 of Rail Bhavan. pic.twitter.com/jL2DfCpM7L
— IANS (@ians_india) May 18, 2026
१५ ऑगस्ट २०२७ ला लोकार्पणाची शक्यता
मुंबई ते अहमदाबाद या देशातील दोन महत्त्वाच्या आर्थिक शहरांना जोडणारा हा प्रकल्प केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘ड्रिम प्रोजेक्ट’ मानला जातो. समोर आलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२७ रोजी या बुलेट ट्रेन सेवेला हिरवा कंदील दाखवण्याची तयारी सुरू आहे.
सध्या मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास रेल्वेने सहा ते सात तासांचा आहे. मात्र बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करता येणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगार क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
समुद्राखालून धावणार रेल्वे; भारतातील पहिला अंडरसी टनेल
या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा भाग म्हणजे समुद्राखालून जाणारा रेल्वे बोगदा. राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू असून त्यातील सुमारे १६ किलोमीटरचा भाग टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने खोदला जाणार आहे.
विशेष म्हणजे, या मार्गात ठाणे खाडीखालून जाणारा तब्बल ७ किलोमीटर लांबीचा समुद्राखालचा बोगदा असणार आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे सेवा समुद्राखालून धावणार असल्याने या प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
देशातील सर्वात मोठ्या टनल बोरिंग मशीनची मदत
या बोगद्याच्या कामासाठी प्रत्येकी ३ हजार टनांपेक्षा अधिक वजनाच्या दोन अत्याधुनिक टनल बोरिंग मशीन (TBM) तैनात करण्यात आल्या आहेत. या मशिन्स देशात आतापर्यंत वापरण्यात आलेल्या सर्वात मोठ्या टनल बोरिंग मशीन मानल्या जात आहेत.
विक्रोळी ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान सुमारे सहा किलोमीटरचा महत्त्वाचा बोगदा या मशीनच्या मदतीने तयार केला जाणार आहे. हा मार्ग दाट लोकवस्तीच्या भागाखालून तसेच मिठी नदीच्या खालीून जाणार असल्यामुळे अभियांत्रिकीच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक मानला जात आहे.
महाराष्ट्र-गुजरातच्या विकासाला नवी गती
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांतील आर्थिक व्यवहारांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. हायस्पीड कनेक्टिव्हिटीमुळे उद्योग क्षेत्र, आयटी, पर्यटन, लॉजिस्टिक्स आणि व्यवसाय क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तसेच, देशात आधुनिक आणि वेगवान रेल्वे युगाची सुरुवात करणारा हा प्रकल्प भविष्यात दिल्ली-वाराणसी, मुंबई-नागपूर, चेन्नई-बंगळुरू यांसारख्या इतर बुलेट ट्रेन प्रकल्पांसाठीही मार्गदर्शक ठरणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
मुंबई-अहमदाबाद दरम्यान हायस्पीड रेल्वे सेवा
अंदाजे वेग ३२० किमी प्रतितास
प्रवास वेळ अवघ्या २ तासांपर्यंत कमी
भारतातील पहिला समुद्राखालचा रेल्वे बोगदा
जपानी शिंकान्सेन तंत्रज्ञानाचा वापर
१५ ऑगस्ट २०२७ रोजी उद्घाटनाची शक्यता
अत्याधुनिक सुरक्षा आणि प्रवासी सुविधा
भारताच्या रेल्वे इतिहासात क्रांती घडवणाऱ्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, ‘वेगवान भारत’च्या दिशेने टाकलेले हे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे.


