स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेहरामपूर परिसरात घडलेल्या गंभीर गुन्ह्याप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गुन्हे शाखेच्या पथकाच्या दक्षतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
बेहरामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर संशयित आरोपी पश्चिम बंगालमधून फरार झाले होते. दरम्यान, आरोपी गीतांजली एक्सप्रेसने कोलकाता येथून मुंबईकडे येत असल्याची खात्रीलायक माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक आणि कक्ष-५ यांच्या संयुक्त पथकाने दादर ते बोरीवली रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. त्यानंतर दोन्ही संशयित आरोपींना बोरीवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान संबंधित आरोपींचा पश्चिम बंगालमधील गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर बेहरामपूर पोलीस ठाण्याचे विशेष पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांनी आरोपींचा ताबा घेतला. दोन्ही आरोपींना १७ मे रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, सुट्टी न्यायालय, किल्ला कोर्ट, मुंबई येथे हजर करण्यात आले असता न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केला.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे रॉकी खान (वय २३, रा. बेहरामपूर, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) आणि शाहदत सरकार (वय ३५, रा. बेहरामपूर, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) अशी आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (विशेष) सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक व कक्ष-५ मधील अधिकारी आणि पोलीस हवालदार यांनी यशस्वीपणे पार पाडली.


