वाडा प्रतिनिधी
भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेडगाव-दाभाड परिसरात घडलेल्या ४० वर्षीय तरुणाच्या खुनाच्या प्रकरणाची अवघ्या ७२ तासांत उकल करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खुनाची फिर्याद देणारा सख्खा भाऊच हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक वादातून तब्बल ८ ते १० लाखांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे उघड झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नरेश टोलाराम पाटील (वय ३७), राकेश भगवान पाटील, प्रेमजीत मधुकर घरत आणि दक्षत भानुकांत भोईर या चौघांना अटक केली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव परेश टोलाराम पाटील (वय ४०) असे असून, आरोपी नरेश हा त्याचा सख्खा भाऊ आहे. नरेश हा रिक्षाचालक असून त्यानेच साथीदारांच्या मदतीने भावाच्या खुनाचा कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
रस्त्यालगत मृतदेह आढळल्याने खळबळ
१२ मे रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास अंबाडी-दाभाड-वाशिंद मार्गावरील शेडगाव गावाजवळ रस्त्यालगत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर १३ मे रोजी गणेशपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला नरेश पाटील याने अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून आपल्या भावाचा खून केल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली होती.
दरम्यान, परेश पाटील हा आपल्या घरातून दुचाकीवरून वसईच्या दिशेने कामावर जात असताना त्याच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खुनामागील कारण आणि आरोपींबाबत कोणताही ठोस धागा सुरुवातीला पोलिसांच्या हाती लागत नसल्याने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशनमुळे संशय बळावला
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे प्रभारी पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार गणेशपुरी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गणेशपुरी आणि पडघा पोलिसांची संयुक्त विशेष पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीचे बारकाईने विश्लेषण केले. त्यामध्ये संशयित आरोपींची वाहने पालघर जिल्ह्यातील केळवे परिसरातील कोरे गावात आढळून आली. याचवेळी फिर्यादी नरेश पाटील याच्या जबाबामध्येही विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
यानंतर आरोपींकडे कसून चौकशी करण्यात आली असता, नरेश पाटील यानेच ८ ते १० लाखांची सुपारी देऊन भावाचा खून घडवून आणल्याची कबुली आरोपींनी दिली. कौटुंबिक वाद आणि वैयक्तिक कारणांमधून हा कट रचण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
संयुक्त पथकाची समन्वयपूर्ण कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते, गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात स्थानिक गुन्हे शाखा, गणेशपुरी आणि पडघा पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या तपासात पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, भाऊसाहेब गायकवाड, रोहन शेलार, मयूर शेवाळे, उमेश खिरड, शरद सुरळकर, निरंजन पाटील यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या जलद, तांत्रिक आणि समन्वयपूर्ण तपासामुळे गंभीर गुन्ह्याची अल्पावधीत उकल झाल्याने परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव करीत आहेत.


