नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटीप्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची व्याप्ती आणखी वाढवली आहे. लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला अटक केल्यानंतर रविवारी CBI न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी सुनावली.
या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना विचारलेला एक प्रश्न विशेष चर्चेत राहिला. “मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका असल्याचे तुम्हाला नेमके कसे समजले?” असा थेट सवाल न्यायाधीशांनी केला. त्यावर तपास अधिकारी पवन कौशिक यांनी न्यायालयात सांगितले की, सेवानिवृत्त प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्यातील संपर्कातून ही माहिती समोर आली. याच कोचिंग नेटवर्कमार्फत प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचा दावा CBI ने केला.
मोबाईलमध्येच सापडली ‘लीक’ प्रश्नपत्रिका
CBI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्झिट रिमांडदरम्यान मोटेगावकरची सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या मोबाईल फोनमध्ये केमिस्ट्री विषयाची कथित ‘लीक’ प्रश्नपत्रिका आढळून आली. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, २३ एप्रिल रोजीच मोटेगावकरने संबंधित प्रश्नपत्रिका मिळवली होती.
याशिवाय, निवृत्त प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी यांच्यासोबत त्याचे आर्थिक आणि तांत्रिक व्यवहार झाल्याचेही तपासात समोर येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे NEET पेपरफुटी रॅकेटमध्ये कोचिंग क्लासेस, शिक्षण क्षेत्रातील काही व्यक्ती आणि मध्यस्थांचे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
CBIची १० दिवसांच्या कोठडीची मागणी; न्यायालयाने दिले ९ दिवस
CBIने न्यायालयाकडे मोटेगावकरच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. आरोपीकडून आणखी इलेक्ट्रॉनिक पुरावे, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि इतर संशयितांची नावे मिळण्याची शक्यता असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ९ दिवसांची CBI कोठडी मंजूर केली.
आता पुढील नऊ दिवस मोटेगावकरची कसून चौकशी होणार असून, या कालावधीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पत्रकारांच्या प्रश्नावर संतप्त प्रतिक्रिया
दरम्यान, न्यायालयातून बाहेर येताना पत्रकारांनी “तुम्हाला काही पश्चात्ताप आहे का?” असा प्रश्न विचारला असता, शिवराज मोटेगावकरने कोणतेही उत्तर न देता संतप्त नजरेने पत्रकारांकडे पाहिले. त्याची ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
संभाजीनगर शाखेबाबत अफवांना उधाण
मोटेगावकरला अटक झाल्यानंतर आरसीसी क्लासेसच्या संभाजीनगर शाखा बंद करण्यात आल्याच्या अफवा पसरल्या. मात्र, संस्थेकडून या दाव्याचे खंडन करण्यात आले. उन्हाळी सुट्ट्यांमुळे २ जूनपर्यंत वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय आधीच जाहीर करण्यात आला होता, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
तथापि, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुणे महापालिकेच्या सभागृहातही पडसाद
NEET पेपरफुटीप्रकरणाचे पडसाद पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात आंदोलन करत पुण्यातील मॉर्डन कॉलेजच्या काही पदाधिकाऱ्यांवर आणि शिक्षकांवर कारवाईची मागणी केली.
या घोटाळ्यात मॉर्डन कॉलेजमधील एका शिक्षकाचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विशेष म्हणजे, कॉलेजच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे या भाजपच्या नगरसेविका असल्याने राजकीय वातावरण अधिक तापले.
सभागृहात काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी करत,
“सरस्वतीच्या मंदिरात कळेना चोर कुठले, साव कुठले…
लक्ष्मीच्या दर्शनानेच परीक्षेचे पेपर फुटले…”
असे उपरोधिक गीत गात सरकारवर आणि शिक्षण व्यवस्थेवर जोरदार टीका केली.
देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता
या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. NEETसारख्या महत्त्वाच्या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असून, पारदर्शक आणि निष्पक्ष तपासाची मागणी जोर धरत आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यापारीकरणामुळे गुणवत्ता आणि प्रामाणिकतेवर गंभीर परिणाम होत असल्याची टीकाही होत आहे.


