रायगड प्रतिनिधी
वेगवान आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी भीषण अपघातांची मालिका घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एक्सप्रेसवेवरील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ परिसरात अवघ्या तीन तासांच्या अंतराने दोन मोठे अपघात झाले. या घटनांमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटर लांब रांगा लागल्या.
पहिल्या अपघातात दोन ट्रक आणि एका कंटेनरची जोरदार धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच त्याच परिसरात एका भरधाव खाजगी बसने तीन ते चार चारचाकी वाहनांना धडक देत दुसरा मोठा अपघात घडवला. सुदैवाने या दुसऱ्या अपघातात जीवितहानी टळली असली तरी काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
ब्रेक फेलचा प्राथमिक अंदाज
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ रंग (कलर) वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नियंत्रण सुटलेल्या ट्रकने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून येणारा दुसरा ट्रक पहिल्या ट्रकवर आदळला आणि काही क्षणांतच भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
त्याच ठिकाणी बसचा कहर
पहिल्या अपघातानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असतानाच त्याच परिसरात दुसरी दुर्घटना घडली. एका भरधाव खाजगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने समोरील तीन ते चार वाहनांना एकामागून एक जोरदार धडक दिली.
या धडकेत काही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बस चालक पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, बचाव पथक आणि प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. वाहनात तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, याचा तपास पोलीस करत आहेत.
वाहतुकीचा मोठा खोळंबा
सलग दोन मोठ्या अपघातांमुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोलमडली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा कित्येक किलोमीटरपर्यंत गेल्या होत्या. अनेक प्रवासी तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडले.
बोरघाट महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले. काही वेळाने एक लेन सुरू करून वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आली.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ परिसरात वारंवार अपघात होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. वाढता वेग, अवजड वाहनांची मोठी संख्या आणि काही ठिकाणचे धोकादायक वळण यामुळे हा परिसर अपघातप्रवण ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या दुहेरी अपघातानंतर प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवण्याचे आवाहन केले असून विशेषतः घाट परिसरात वेगावर नियंत्रण ठेवण्याचा इशारा दिला आहे.

