रायगड प्रतिनिधी
रायगड : आळंदी येथील खासगी कोचिंग क्लासच्या सहलीसाठी दिवेआगर येथे आलेल्या विद्यार्थ्यांवर समुद्राने काळाचा घाला घातला. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे दिवेआगर परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आळंदी येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल दिवेआगर येथे आली होती. समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेत असताना काही विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र, काही वेळातच ते खोल पाण्यात गेले आणि समुद्राच्या जोरदार प्रवाहात अडकले. परिस्थिती लक्षात येताच समुद्रकिनारी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने समुद्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय पथकाने केलेल्या उपचारांनंतरही आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेची नेमकी कारणे, तसेच सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना समुद्रात उतरण्यास परवानगी देताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि देखरेख ठेवण्यात आली होती का, याचीही चौकशी केली जात आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे दिवेआगर परिसरात शोककळा पसरली आहे. सहलीसाठी गेलेली मुले सुखरूप परततील, अशी अपेक्षा असलेल्या कुटुंबीयांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. समुद्रकिनारी पर्यटन करताना पाण्याची खोली, समुद्राचा प्रवाह आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.


