रायगड प्रतिनिधी
रायगड : आई-वडिलांमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या २४ वर्षीय मुलावर वडिलांनी धारदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात घडली. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. साहिल ऊर्फ सई सचिन चिकणे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या हत्येप्रकरणी वडील सचिन बजरंग चिकणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकणे कुटुंबीय मूळचे पोलादपूर तालुक्यातील ओंबळी येथील असून सध्या लोहारे देऊळकोंड येथील आडरस्त्यावरील एका इमारतीत राहत होते. घटनेच्या दिवशी सचिन चिकणे आणि त्यांची पत्नी संध्या चिकणे यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत असल्याचे पाहून साहिलने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, वादाच्या रागातून सचिन चिकणे यांनी स्वयंपाकघरातील धारदार चाकू घेत साहिलवर हल्ला केला. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या साहिलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर सचिन चिकणे तेथून निघून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यानंतर मृताच्या आई संध्या चिकणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून सचिन चिकणे यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे….या घटनेमुळे पोलादपूर परिसरात खळबळ उडाली आहे.


