रायगड प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. ‘विनर्स अकॅडमी फॉर ११ वी आणि १२ वी सायन्स’ या क्लासेसमधील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. भरतीची वेळ असताना समुद्रात उतरल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेने आळंदी परिसरावर शोककळा पसरली असून, पालकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
एकाला वाचवण्यासाठी गेले अन् अनेक जण समुद्रात ओढले गेले
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी पोहोचले होते. समुद्राला भरती असतानाच काही विद्यार्थी पाण्यात उतरले. सुरुवातीला दोन विद्यार्थी समुद्रातील खोल खड्ड्यात अडकून बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी इतर विद्यार्थी धावले; मात्र एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी विद्यार्थी खोल पाण्यात खेचले गेले.
विद्यार्थ्यांची आरडाओरड ऐकून स्थानिक नागरिक, जीवरक्षक आणि वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही मिनिटांत बचावकार्य सुरू करण्यात आले. सुमारे ३० ते ३५ विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, आठ विद्यार्थ्यांचा जीव वाचवता आला नाही.
‘२० मिनिटांत सगळं घडलं’; भाऊ साळुंखेंनी सांगितला घटनाक्रम
महाकाली वॉटर स्पोर्ट्सचे भाऊ साळुंखे यांनी या दुर्घटनेचा घटनाक्रम सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुपारी तीनच्या सुमारास काही विद्यार्थी पाण्यात उतरले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना समुद्रात आत न जाण्याची सूचना करण्यात आली होती.
“साडेतीनच्या सुमारास मी मुलांना इथे थांबू नका, वॉटर स्पोर्ट्सच्या पॉइंटजवळ थांबा आणि समुद्रात आत जाऊ नका, असे सांगितले होते. त्यानंतर मी माझ्या पॉइंटच्या दिशेने निघालो. अवघ्या २० मिनिटांत संपूर्ण घटना घडली. काही वेळाने एक विद्यार्थी धावत आला आणि ‘आमच्यापैकी एक जण बुडाला आहे,’ असे सांगितले. त्यानंतर आम्ही तातडीने टीम घेऊन घटनास्थळी पोहोचलो,” असे साळुंखे यांनी सांगितले.
बचाव पथकाने समुद्रात उतरून शोधमोहीम सुरू केली. काही मिनिटांत सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, आठव्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी सुमारे दीड तास प्रयत्न करावे लागले.
दोन तास बचावकार्य, पण एकालाही वाचवता आले नाही
“समुद्रातील खड्ड्यांचा विद्यार्थ्यांना अंदाज आला नाही. एका विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी गेले असता इतर विद्यार्थीही खोल पाण्यात ओढले गेले. आम्ही सुमारे दोन तास प्रयत्न केले; मात्र दुर्दैवाने एकाही विद्यार्थ्याला वाचवता आले नाही,” अशी हळहळ भाऊ साळुंखे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना तातडीने समुद्रातून बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचार आणि पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करण्यात आले; मात्र आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
सहलीचा आनंद क्षणात शोकांतिकेत बदलला
आळंदीहून उत्साहाने सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समुद्रकिनारी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भरतीच्या काळात पर्यटक आणि विद्यार्थ्यांनी पाण्यात उतरण्यापूर्वी स्थानिक प्रशासन व जीवरक्षकांच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा एकदा जाणवू लागली आहे.


