रायगड प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार ३५३ वा राज्याभिषेक दिन सोहळा रविवारी दुर्गराज रायगडावर पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थिती लावत शिवरायांना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही दिली.
सोहळ्याला रोहयो मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात शिंदे यांनी रायगडावरील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीपुरवठा योजनेस तातडीने मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या सन्मानाचा घालून दिलेला आदर्श शासनाच्या धोरणांत प्रतिबिंबित होत असल्याचे सांगत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यंदा पावसाने ओढ दिल्यास अथवा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. शासकीय तिजोरीवर पहिला अधिकार अन्नदाता शेतकऱ्यांचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात मंत्री भरत गोगावले यांनी रायगड किल्ला आणि परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. पाचाड येथे प्रस्तावित ‘शिवसृष्टी’ प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५० कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख करत या प्रकल्पास मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता व अतिरिक्त निधी देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच रायगडावरील तटबंदी व ऐतिहासिक संरचनांच्या दुरुस्तीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सोहळ्याच्या प्रारंभी रायगड पोलीस दलाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा राजसदरेवर दाखल झाला. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. ढोल-ताशे, पोवाडे, लोकनृत्ये, युद्धकला सादरीकरणे आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर शिवमय झाला.
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ आणि अन्य शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून सुरक्षा, वाहतूक, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, पार्किंग आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या.


