मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात एकाच वेळी १ हजार ४४० एमबीबीएस डॉक्टर दाखल झाले असून, त्यामध्ये सुमारे ७०० महिला डॉक्टरांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. याशिवाय आणखी ६२१ डॉक्टरांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नवनियुक्त १ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वितरणाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. नव्या डॉक्टरांनी समर्पण, सेवाभाव, संवेदनशीलता आणि रुग्णांशी योग्य संवाद ठेवून काम करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. डॉक्टर म्हणून पदवी मिळवणे महत्त्वाचे असले, तरी रुग्णांचा विश्वास संपादन करणे हीच खरी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता आवश्यक आहे. डॉक्टरांना चांगले निवासस्थान, स्वच्छ व सुरक्षित परिसर, विरंगुळा आणि क्रीडा सुविधा देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यांच्या कामासाठी पोषक वातावरण निर्माण करताना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली. प्रशासकीय फाईल तयार होण्यापूर्वी गरजू रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील एकही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय डॉक्टरविना राहू नये, यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. सुमारे १० हजार उमेदवारांमधून या डॉक्टरांची निवड करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात आणखी ६०० डॉक्टरांची भरती, १ हजार ९०० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची उपकेंद्रांमध्ये नियुक्ती आणि ३५० नवीन ‘१०८’ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५ हजार कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १२ डॉक्टरांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनीही मनोगत व्यक्त केले.


