मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरून सुरू असलेल्या विभागीय चौकशीचा अहवाल अखेर समोर आला असून, या प्रकरणात दोषी ठरलेल्या संरक्षण व सुरक्षा विभागातील पोलीस हवालदार श्याम मगन सोनावणे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
श्याम सोनावणे हे बाबा सिद्धीकी यांच्याकडे अंगरक्षक म्हणून नियुक्त होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये वांद्रे परिसरात बाबा सिद्धीकी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिद्धीकी यांचा मृत्यू झाला होता. राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. विशेषतः अंगरक्षक म्हणून नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांची भूमिका, त्यावेळची दक्षता आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन याबाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
या विभागीय चौकशीत श्याम सोनावणे यांच्याकडून कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समजते. चौकशीदरम्यान त्यांना आधी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर विभागीय पातळीवरील तपास पूर्ण झाल्यानंतर ते दोषी आढळल्याने त्यांच्यावर बडतर्फीची अंतिम कारवाई करण्यात आली. २ मे २०२६ रोजी त्यांना बडतर्फीची नोटीस बजाविण्यात आली होती.
दरम्यान, अन्य एका प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास आनंद हजारे तसेच पोलीस शिपाई रहिमान बाबूलाल सय्यद, राजेंद्र विठ्ठल दिवटे, उमेश पांडुरंग बांगर, अल्तमेश इब्राहिम शेख आणि विशाल बापू पारे यांचा समावेश आहे. संबंधित कर्मचारी नवघर, पंतनगर, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर आणि मुलुंड पोलीस ठाण्यांशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
५ एप्रिल २०२६ रोजी मुलुंडमधील आनंदनगर टोलनाका चौकी येथे या सर्वांची ड्युटी होती. त्यावेळी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत संबंधित कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित सहा पोलिसांविरोधात विभागीय चौकशी सुरू असून, या चौकशीत गंभीर निष्कर्ष समोर आल्यास त्यांच्यावरही बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस दलातील शिस्त आणि कर्तव्यपालनाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा संदेश या सलग कारवायांमधून दिला जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.


