मुंबई प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या, कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि सांस्कृतिक वारशाच्या जिवंत साक्षीदार कॉ. शांताबाई साठे (दोडके) यांचे रविवारी, ४ मे रोजी सायंकाळी कांदिवली येथील खासगी रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने कष्टकरी, पुरोगामी आणि सांस्कृतिक चळवळीतील एक स्वाभिमानी पर्व संपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
कॉ. शांताबाई या केवळ अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या नव्हत्या, तर त्यांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपणाऱ्या एक जिद्दी कार्यकर्त्या होत्या. आयुष्यभर त्यांनी कम्युनिस्ट विचारसरणी, कामगार चळवळ आणि सांस्कृतिक आंदोलनाशी नाळ जोडून ठेवली. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत तत्त्वांशी तडजोड केली नाही.
बालपणापासूनच चळवळीचे संस्कार
कॉ. शांताबाई या अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नी कॉ. जयवंताबाई यांच्या कन्या होत. घरातील वातावरणच चळवळीचे असल्याने लहान वयातच त्यांच्यावर डाव्या विचारसरणीचे संस्कार झाले. त्यांनी बालपणी ‘बाल संघा’त काम केले, तर पुढे ‘लाल बावटा कला पथका’तून सांस्कृतिक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
त्या काळात त्यांनी रोझा देशपांडे, आर. बी. मोरे यांच्या कुटुंबीयांसह अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांसोबत सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनाट्य आणि जनजागृती मोहिमांमध्ये काम केले. सामाजिक परिवर्तनासाठी कला हे प्रभावी माध्यम ठरू शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय सहभाग, तुरुंगवासही भोगला
१९४९ मध्ये कम्युनिस्ट पक्षावरील दडपशाहीच्या काळात शांताबाईंनी सक्रिय भूमिका घेतली होती. त्या काळात त्यांना काही महिने तुरुंगवासही भोगावा लागला. संघर्ष त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी औषध कंपनीत नोकरी स्वीकारली. दिवसभर नोकरी आणि त्यानंतर कामगार संघटनांचे काम असा त्यांचा दिनक्रम असे. कामगारांचे प्रश्न, महिलांचे हक्क आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला.
माणुसकीचा वारसा जपणारी कन्या
स्वतः अत्यंत साधेपणाने जगणाऱ्या शांताबाई मनाने मात्र विलक्षण मोठ्या होत्या. आपल्या तुटपुंज्या पगारातून त्या दरमहा वाटेगाव येथे अण्णाभाऊंच्या पहिल्या पत्नी कोंडाबाईंना आर्थिक मदत पाठवत असत. अण्णाभाऊंच्या पहिल्या कुटुंबाशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध कायम ठेवले.
अण्णाभाऊंचे पुत्र मधुकर साठे यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. कुटुंब, विचार आणि माणुसकी यांचा समतोल त्यांनी आयुष्यभर जपला.
साहित्य, लोकनाट्य आणि सांस्कृतिक चळवळीतील योगदान
कॉ. शांताबाई या अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या पहिल्या वाचकांपैकी एक होत्या. त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि लोकनाट्यांवर त्या चर्चा करत असत. साहित्य आणि चळवळ यांचे नाते त्यांनी जवळून अनुभवले.
अमर शेख आणि दत्ता गव्हाणकर यांच्या कलापथकात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ७० च्या दशकात ‘काई चालं न गा’ या लोकनाट्यात त्यांनी भूमिका साकारली होती. तर १९८६ मध्ये ‘लोकमंच’ संस्थेच्या गाजलेल्या ‘अकलेची गोष्ट’ या लोकनाट्यात त्यांनी अभिनयासह दिग्दर्शन सहाय्याची जबाबदारीही सांभाळली.
स्वाभिमानाने जगलेल्या आयुष्याची अखेर
उतारवयात कलाकार पेन्शन मिळवण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, कोणत्याही सत्ताधाऱ्यांसमोर त्यांनी कधीही मान झुकवली नाही. शासनाकडे ‘जी हुजुरी’ करून लाभ मिळवण्यापेक्षा स्वाभिमानाने जगणे त्यांनी पसंत केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्येला समाजाने आणि व्यवस्थेने अपेक्षित सन्मान दिला नाही, याची खंत त्यांना अखेरपर्यंत होती. तरीही त्यांनी संघर्ष, तत्त्वनिष्ठा आणि कष्टकरी चळवळीशी असलेली बांधिलकी शेवटच्या क्षणापर्यंत जपली.
त्यांच्या निधनाने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारविश्वाशी थेट जोडलेला एक महत्त्वाचा दुवा हरपला आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी मानली जात आहे.


