पुणे प्रतिनिधी
ख्यातनाम पत्रकार, लेखक आणि ज्येष्ठ वृत्तविश्लेषक राजदीप सरदेसाई यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यंदाचा ‘डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून दोन लाख एकावन्न हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ही माहिती भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवार, १० मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, सातारा रोड, धनकवडी, पुणे येथे होणाऱ्या भव्य समारंभात हा पुरस्कार सरदेसाई यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते भारती विद्यापीठाचे मुखपत्र ‘विचार भारती’च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे.
समारंभाला भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे तसेच डॉ. के. डी. जाधव उपस्थित राहणार आहेत.
‘गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन’ची परंपरा
यावेळी बोलताना डॉ. विश्वजीत कदम यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, “बहुजन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन डॉ. पतंगराव कदम यांनी अवघ्या १९ व्या वर्षी १० मे १९६४ रोजी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली. ‘गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन’ हा विचार त्यांनी आयुष्यभर जपला.”
त्यांच्या दूरदृष्टी, गुणवत्तेचा ध्यास आणि अविरत परिश्रमामुळे भारती विद्यापीठाने गेल्या सहा दशकांत देशाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात दर्जेदार शिक्षण पोहोचवून हजारो विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य विद्यापीठाने केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशभरात लौकिक मिळवलेले विद्यापीठ
भारती विद्यापीठाला १९९६ मध्ये भारत सरकारने अभिमत विश्वविद्यालयाचा दर्जा प्रदान केला. त्यानंतर गेल्या तीन दशकांत गुणवत्तेच्या बळावर विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून ‘ए-ग्रेड’ मानांकन, नॅककडून पुनर्मूल्यांकनात मिळालेला ‘अ++’ दर्जा तसेच एनआयआरएफ क्रमवारीत विविध महाविद्यालयांनी मिळवलेले स्थान ही विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.
आज भारती विद्यापीठाचे विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असून त्यांचे यश हेच विद्यापीठाच्या कार्याची खरी पावती असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.


