सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील बोरमणी गावाजवळ घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याला अखेर अटक करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. भावाच्या निधनानंतर नात्यांची सर्व बंधने झुगारून देत आरोपीने संपत्तीच्या वादातून स्वतःच्या वहिनीसह दोन पुतण्यांची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण राज्य हादरले होते. घटनेनंतर तब्बल पाच दिवस फरार असलेला आरोपी पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.
२ मे रोजी बोरमणी गावात ही थरारक घटना घडली होती. कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या हव्यासातून आरोपी शंकर मस्के याने आपल्या भावजय गायत्री मस्के, पुतणी प्रिया मस्के आणि पुतण्या शिवराज मस्के यांच्यावर मध्यरात्री घरात घुसून तलवारीने सपासप वार केले होते. या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. रक्ताच्या नात्यांनाच काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता.
घटनेनंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करत राज्याबाहेर पलायन केले होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विविध विशेष पथके तयार केली होती. मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पश्चिम बंगालमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. आरोपीला सोलापूरमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
या तिहेरी हत्याकांडामागे संपत्तीचा वाद आणि आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचे तपासात समोर आले आहे. मयत गायत्री मस्के यांनी आरोपी शंकर मस्के याला सुमारे २५ लाख रुपये उसने दिले होते. या पैशांच्या परतफेडीसाठी त्या सातत्याने तगादा लावत होत्या. तसेच जमिनीच्या वाटणीवरूनही दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. याच वादातून आरोपीने संतापाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे.
दरम्यान, या प्रकरणात केवळ मुख्य आरोपीच नव्हे तर इतर काहींचाही सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणाशी संबंधित पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपीच्या अटकेनंतर आता हत्याकांडातील कट, नियोजन आणि इतर आरोपींची भूमिका याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बोरमणी गावावर शोककळा पसरली होती. गावकऱ्यांकडून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत असून, या प्रकरणाचा तपास सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.


