सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून महायुतीने जिल्ह्यात स्पष्ट संख्याबळ उभे केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडील निवडणुकांमध्ये भाजपने केलेल्या दमदार कामगिरीमुळे सोलापुरात पक्षाने ‘नंबर वन’चे स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत महायुतीची ताकद विरोधकांवर स्पष्टपणे भारी पडताना दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी एकूण ५५५ मतदार मतदान करणार आहेत. या मतदारांपैकी तब्बल ४०६ मते महायुतीकडे असल्याचे चित्र समोर आले आहे. यात एकट्या भाजपकडेच ३१३ सदस्यांचे संख्याबळ असल्याने भाजपचा उमेदवार निवडून येणार, याबाबत राजकीय वर्तुळात जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता निवडणुकीत खरी उत्सुकता उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लागली आहे. माजी आमदार परिचारक यांचे नाव चर्चेत असले तरी पक्षश्रेष्ठी अंतिम क्षणी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चार वर्षांनंतर रंगणार निवडणूक
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक तब्बल चार वर्षे रखडली होती. ही निवडणूक २०२२ मध्ये अपेक्षित होती. मात्र महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि नगरपंचायतींवर प्रशासक असल्याने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निवडणुकांमध्ये भाजपने जिल्हाभर प्रभावी कामगिरी करत अनेक ठिकाणी सत्ता मिळवली. विशेषतः नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने प्रथमच चार नगराध्यक्ष निवडून आणत तब्बल १४४ जागांवर विजय मिळविला. याशिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात माढा, माळशिरस, नातेपुते नगरपालिका आणि श्रीपूर-महाळुंग नगरपंचायतीतही भाजपने प्रभाव वाढवला होता. याच राजकीय गणिताचा थेट फायदा आता विधान परिषद निवडणुकीत दिसून येत आहे.
महायुतीची भक्कम आघाडी
भाजपसोबतच महायुतीतील शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्थानिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र ताकद उभी केली होती. शिंदेसेनेने ६६ जागांवर विजय मिळवत जिल्ह्यात प्रभावी उपस्थिती दाखवली, तर राष्ट्रवादी काँग्रेसने २७ जागा जिंकल्या. त्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ ४०६ वर पोहोचले आहे. म्हणजेच एकूण मतदारसंख्येच्या जवळपास ७४ टक्के मते महायुतीकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याउलट विरोधकांकडे केवळ ५७ मतांचे संख्याबळ असल्याचे बोलले जात आहे. काही अपक्ष आणि स्थानिक समीकरणे निवडणुकीत प्रभाव टाकू शकतात, मात्र सध्याच्या आकडेवारीनुसार महायुतीचा विजय जवळपास एकतर्फी मानला जात आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या डावपेचांवर नजर
या निवडणुकीत विरोधकांकडून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे. २०२२ मधील काही आघाडीची मते फोडण्याचा किंवा स्थानिक पातळीवर नवीन समीकरणे उभी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः माढा आणि माळशिरस तालुक्यातील राजकीय हालचाली आगामी दिवसांत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
दरम्यान, भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असल्याने अंतर्गत राजकारणालाही वेग आला आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, महायुतीतील समन्वय आणि पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय यावर उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याच्या राजकीय गणितानुसार सोलापुरातून भाजपचाच आमदार विधान परिषदेत जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.


