पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, फाशी,देण्याची मागणी सर्व स्तरांतून जोर धरत आहे.
या प्रकरणात आता एक वेगळाच पैलू समोर आला आहे. आरोपी भीमराव कांबळे याच्या पत्नी आणि मुलाने प्रथमच माध्यमांसमोर येत आपल्या भावना व्यक्त केल्या असून, त्यांनीही या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनीही आरोपीविरुद्ध अत्यंत कठोर शब्दांत संताप व्यक्त करत, फाशीची शिक्षा देखील अपुरी असल्याचे मत मांडले.
आरोपीच्या पत्नीने माध्यमांशी संवाद साधताना भावनांचा बांध फुटल्यासारखी प्रतिक्रिया दिली. “ज्या ठिकाणी त्या निरागस बाळाची हत्या झाली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे. त्याला जिवंत जाळलं पाहिजे,” अशा संतप्त शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. बोलताना त्या वारंवार अश्रू अनावर होत होत्या. “मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कळवू नका,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
पत्नीने पुढे सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा आणि भीमरावचा कोणताही संबंध नव्हता. तरीही त्याने केलेल्या कृत्यामुळे समाजात त्यांच्यावरही कलंक लागल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली. “फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ आहे,” असे म्हणत त्यांनी न्यायव्यवस्थेकडून अत्यंत कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, आरोपीच्या मुलानेही वडिलांविषयी तीव्र संताप व्यक्त केला. “अशा माणसाला वडील म्हणण्याची लाज वाटते. त्याच्या पोटी जन्माला आलो, हाच माझा गुन्हा आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना मांडल्या. या घटनेमुळे त्यालाही मानसिक धक्का बसल्याचे त्याने सांगितले.
नसरापूर प्रकरणानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली असून, विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय नेत्यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर कठोर कायदे आणि जलद न्यायव्यवस्था यांची गरज अधोरेखित होत आहे.
या प्रकरणातील तपास वेगाने सुरू असून, आरोपीविरुद्ध कडक कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.


