पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या अमानुष कृत्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, “ही घटना अत्यंत संतापजनक, क्लेशदायक आणि निंदनीय आहे. अशा विकृत प्रवृत्तीला समाजात कोणतीही जागा नाही,” असे स्पष्टपणे म्हटले. त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांप्रती सखोल सहवेदना व्यक्त करत, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ६५ वर्षीय आरोपीला अटक केली असून, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर येत असून, या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून न्यायालयात खटला मजबूतपणे उभा राहील.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी राज्य सरकार न्यायालयाकडे विशेष विनंती करणार आहे. “आरोपीला शक्य तितक्या लवकर कठोरात कठोर शिक्षा, म्हणजेच मृत्यूदंड मिळावा, ही राज्य सरकारची भूमिका आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. “या नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा,” असे आदेश त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना दिले आहेत.
या घटनेनंतर नसरापूर गावात संतापाचा उद्रेक झाला. गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळत ‘मुका मोर्चा’ काढून या अमानुष कृत्याचा निषेध केला. “आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली. प्रशासनाकडून तातडीने कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी परिसरात अद्याप तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे.
दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी राज्यातील महिला व बालसुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “अशा संवेदनशील घटनेत राजकारण करणे योग्य नाही. पीडितेला न्याय मिळवून देणे हेच सर्वांचे प्राधान्य असले पाहिजे,” असे सांगत सरकार आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना करेल, असा विश्वास व्यक्त केला.
या हृदयद्रावक घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, ‘अशा विकृत प्रवृत्तीला आळा कधी बसणार?’ हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असली, तरी आता सर्वांचे लक्ष न्यायप्रक्रियेच्या गतीकडे लागले आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून या चिमुकलीला न्याय मिळतो का, आणि आरोपीला खरोखरच फाशीची शिक्षा होते का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.


