नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून सोमवारी जाहीर झालेल्या निकालांनी राष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांतील निकालांनी सत्तेची नवी समीकरणे स्पष्ट केली आहेत.
या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप)ने बहुतेक राज्यांत प्रभावी कामगिरी करत आपली ताकद पुन्हा सिद्ध केली, तर काही राज्यांत प्रादेशिक पक्ष आणि नव्या राजकीय शक्तींनी पारंपरिक समीकरणांना धक्का दिला.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झंझावात
पश्चिम बंगालमध्ये यंदा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. भाजपने तब्बल १९४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस ९३ जागांवर मर्यादित राहिली. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, तर डाव्या पक्षांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.
हा निकाल राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक बदल मानला जात असून, अनेक दशकांनंतर सत्तांतर घडल्याचे चित्र आहे.
आसाममध्ये भाजपची सत्ता कायम
आसाममध्ये भाजपने पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळवत सत्ता राखली. भाजपने ९८ जागा जिंकल्या, तर काँग्रेस २४ जागांवर थांबली. इतर पक्षांना मर्यादित यश मिळाले.
ईशान्य भारतात भाजपचे वर्चस्व कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.
तामिळनाडूत ‘टीव्हीके’चा उदय; पारंपरिक पक्षांना धक्का
तामिळनाडूमध्ये यंदा सर्वाधिक चर्चेत राहिलेला निकाल म्हणजे अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाचा.
टीव्हीकेने १०९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. तर अण्णाद्रमुकला ६५ आणि द्रमुकला ६० जागा मिळाल्या.
हा निकाल राज्यातील पारंपरिक राजकारणाला मोठा धक्का मानला जात आहे.
केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर; डाव्यांचा गड ढासळला
केरळमध्ये दीर्घकाळ सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीला मोठा धक्का बसला. काँग्रेसने १०१ जागा जिंकत स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. डाव्या आघाडीला ३७ जागांवर समाधान मानावे लागले.
राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे.
पुद्दुचेरीत भाजपची सत्ता
पुद्दुचेरीमध्ये भाजपने २२ जागा जिंकत सत्ता काबीज केली. काँग्रेसला केवळ ६ जागा मिळाल्या.
या निकालामुळे दक्षिण भारतात भाजपची पकड आणखी मजबूत झाली आहे.
महाराष्ट्रातील पोटनिवडणुका: भाजपचा दबदबा
राहुरीत विक्रमी आघाडी
राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी १,१५,८५५ मते मिळवत राष्ट्रवादी (SP)चे गोविंद मोकाटे यांना मोठ्या फरकाने मागे टाकले. २३ व्या फेरीअखेर तब्बल ९०,९७९ मतांची आघाडी त्यांनी घेतली.
बारामतीत ‘वहिनीं’चा एकतर्फी विजयाकडे वाटचाल
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले.
२१ व्या फेरीअखेर त्यांना १,८९,६५७ मते मिळाली असून इतर उमेदवारांना केवळ ४,१५६ मते मिळाली आहेत.
या निकालामुळे बारामतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
राजकीय परिणाम: पुढील राजकारणाची दिशा ठरणार
या पाच राज्यांच्या निकालांनी देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने अनेक राज्यांत आपली ताकद वाढवली असली, तरी तामिळनाडूत नव्या पक्षाचा उदय आणि केरळमध्ये सत्तांतराचे संकेत हे महत्त्वाचे राजकीय संदेश देणारे ठरले आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसाठी हा निकाल इशारा मानला जात असून, नव्या रणनीतीची गरज अधोरेखित झाली आहे. दुसरीकडे, भाजपसाठी हा निकाल आत्मविश्वास वाढवणारा ठरला असून, पुढील काळात पक्ष आणखी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


