बीड प्रतिनिधी
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अपेक्षांना छेद देणारा निकाल लागला असून, माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सहानुभूतीची लाट असल्याचे मानले जात असतानाही त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांच्या फरकाने विजय मिळवत सरपंचपदावर कब्जा केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात मस्साजोग ग्रामपंचायतीची निवडणूक हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या निवडणुकीला भावनिक आणि राजकीय असे दुहेरी स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी गावातील काही गटांकडून जोर धरत होती. मात्र, अखेर प्रत्यक्ष मतदान पार पडले आणि त्यातून अनपेक्षित असा निकाल समोर आला.
या निवडणुकीत एकूण १७४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी स्वरूपानंद देशमुख यांना ९१४ मते मिळाली, तर अश्विनी देशमुख यांना ८२२ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे स्पष्ट बहुमतासह स्वरूपानंद देशमुख यांचा विजय निश्चित झाला.
निवडणुकीपूर्वी वातावरण मात्र पूर्णपणे वेगळे होते. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावात सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल, अशी सर्वसाधारण धारणा होती. त्यांच्या प्रचारासाठी संतोष देशमुख यांची दोन्ही मुलेदेखील सक्रियपणे मैदानात उतरली होती. त्यामुळे भावनिक पातळीवर मतदार त्यांच्या बाजूने झुकले असल्याचे चित्र दिसत होते. परंतु प्रत्यक्ष मतदानात ग्रामस्थांनी वेगळाच कौल दिला.
या निकालामागे स्थानिक पातळीवरील समीकरणे, विकासाच्या मुद्द्यांवरील चर्चा आणि गटबाजी यांचा प्रभाव असल्याचे जाणकारांचे मत आहे. सहानुभूतीची लाट असली तरी मतदान करताना मतदारांनी स्थानिक नेतृत्व आणि कामगिरीला प्राधान्य दिल्याचे या निकालातून दिसून येते.
विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा संतोष देशमुख यांच्याकडून केवळ ९ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या वेळी त्यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काहींनी तो मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी अखेरपर्यंत माघार घेतली नाही आणि यावेळी विजय मिळवत त्यांनी मागील पराभवाचा बदला घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना स्वरूपानंद देशमुख म्हणाले, “माझी जनता माझ्यासोबत आहे, हे मी सुरुवातीपासून सांगत होतो. आज मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून त्यावर शिक्कामोर्तब केले. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी याआधीही पुढे होतो आणि पुढेही राहणार आहे.”
दरम्यान, ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. हत्या प्रकरणात अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते, तसेच काही आरोपींना अटकही करण्यात आली होती. या घटनेनंतर देशमुख कुटुंबीयांनी सातत्याने न्यायाची मागणी लावून धरली होती.
या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीचा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता, ग्रामीण मतदारांच्या मनोवृत्तीचेही प्रतिबिंब मानला जात आहे. भावनिक लाटेपेक्षा प्रत्यक्ष कामगिरी, स्थानिक समीकरणे आणि विश्वासार्हता यांना मतदारांनी अधिक महत्त्व दिल्याचे या लागलेल्या निकालातून स्पष्ट होते.


