
श्रीकाकुलम
पवित्र एकादशीचा दिवस… भक्तिभावाने गजबजलेलं मंदिर परिसर… आणि त्याच क्षणी निर्माण झालेला गोंधळ, आरडाओरडा आणि जीवघेणा धसका! आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात शनिवारी वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन नऊ भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Stampede at Venkateswara Swamy Temple in Andhra Pradesh | Former Chief Minister YS Jagan Mohan Reddy expressed deep shock and grief over the tragic stampede.
In a statement, Jagan Mohan Reddy said that similar incidents had occurred earlier — six devotees died during Vaikuntha… https://t.co/SSHk4CHmdm
— ANI (@ANI) November 1, 2025
क्षणात बदललं वातावरण
दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी रेलचेल होती. दर्शनासाठी रांगा वाढत गेल्या. गर्दीची दाटी वाढत असतानाच अचानक एकच गोंधळ उडाला आणि पुढील रांगेतील भाविक कोसळू लागले. काही क्षणांतच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दुर्दैवी चेंगराचेंगरी झाली. पाहताक्षणी निष्प्राण देह, विखुरलेलं सामान आणि एकच हंबरडा… अंगावर काटा आणणारे दृश्य मंदिर परिसरात पसरले.
घटनेनंतर काही भाविकांना तत्काळ सीपीआर देत वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये जखमी झाले असून गंभीर जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांची तातडीची प्रतिक्रिया
या घटनेनंतर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला. “अत्यंत वेदनादायी घटना आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी मन:पूर्वक संवेदना व्यक्त करतो. जखमींवर योग्य उपचार सुरू करण्याचे आणि मदतकार्यास गती देण्याचे आदेश दिले आहेत,” असे त्यांनी म्हटले. प्रशासनाला घटनास्थळी सतत लक्ष ठेवून मदतकार्य सुरळीत राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कारण अद्याप अस्पष्ट
नेमकी चेंगराचेंगरी कशामुळे झाली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मंदिर प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गर्दी नियंत्रण यंत्रणेच्या त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पुढील काही तासांत संपूर्ण तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
धर्मभावनेचा उत्सव दुर्दैवाने शोकांत होण्याची ही घटना पुन्हा एकदा मोठ्या धार्मिक स्थळी गर्दी व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण करते. भाविकांच्या प्राणांची किंमत सांगणारी ही दुर्घटना प्रशासनाला जागवणारी आहे.


