आंध्रप्रदेश वृत्तसंस्था
सोनम रघुवंशी प्रकरणाची धग अद्याप शमलेली नसतानाच देशात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच वेळेस आई आणि मुलीच्या प्रेमात असलेल्या विवाहित बँक मॅनेजरने, नवविवाहित पतीची हत्या करवून केल्याचा उघडकीस आलेला प्रकार सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
लग्नाच्या महिन्याभरातच मृत्यूच्या कुशीत!
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात ऐश्वर्या नामक तरुणीचे १८ मे २०२५ रोजी तेजेश्वर या तरुणाशी विवाह झाले. मात्र, अवघ्या ३० दिवसांतच म्हणजे १७ जून रोजी तेजेश्वरचा मृतदेह सापडला. हे एका क्रूर कटाचा परिणाम असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रेमसंबंधांची जाळं, सुपारी हत्येचा कट!
या हत्यामागे ऐश्वर्या आणि तिचा प्रियकर तिरुमल राव (बँक मॅनेजर) यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकंच नव्हे तर, तिरुमलचे फक्त ऐश्वर्याशीच नव्हे तर तिच्या आईशीही प्रेमसंबंध होते. या त्रिकोणी नात्याच्या गुंत्यातून तेजेश्वरचा काटा दूर करण्यासाठी २ लाख रुपयांची सुपारी देऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
फोन कॉल्स, लोकेशन व सीसीटीव्हीने केला पर्दाफाश
पोलीस तपासात समोर आले की ऐश्वर्या आणि तिरुमल राव यांच्यात २००० पेक्षा अधिक वेळा फोनवर संवाद झाला होता. तसेच, तेजेश्वरच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचा मृतदेह कुरनूलच्या पनयम भागात कालव्यात सापडला. सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो कुरनूलमध्ये जाताना दिसला होता.
‘जमिनीचं सर्वेक्षण’ सांगून नेलं मृत्यूपंथावर
तिरुमल रावने भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने तेजेश्वरला कुरनूलला नेले. जमिनीचं सर्वेक्षण आहे, असं सांगून त्याला विश्वासात घेतलं आणि नंतर त्याची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकला गेला.
कुटुंबाच्या संशयामुळे उकलला गुन्हा
हत्या झाल्यानंतर ऐश्वर्यावर संशयाची सुई वळली कारण तिचे तिरुमल रावसोबतचे अफलातून संबंध आधीपासूनच चर्चेत होते. पोलीस तपासात हे सर्व पटत गेलं आणि अखेर या नाट्यमय हत्याकांडाचा पडदा फाटला.
एका विचित्र प्रेमकहाणीची क्रूर परिणती
सोनमनं नवऱ्याची हत्या केल्याप्रकरणात देश हादरलेला असतानाच, ऐश्वर्याच्या रूपाने आणखी एक क्रौर्याची कथा उघड झाली आहे. एकाच पुरुषाच्या प्रेमात असलेल्या आई आणि मुलीच्या नात्याची ही अकल्पित कहाणी सध्या सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत आहे.
तेजेश्वर वध प्रकरणातील मुख्य मुद्दे:
18 मे: ऐश्वर्या व तेजेश्वर विवाहबद्ध
17 जून: तेजेश्वर बेपत्ता
21 जून: मृतदेह सापडला
2000+ कॉल्स: ऐश्वर्या व तिरुमल यांच्यात
₹2 लाख सुपारी: भाडोत्री मारेकऱ्यांना
आई व मुलीशी एकाच व्यक्तीचे संबंध
पुढील तपासासाठी दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, या गुन्ह्यात अजून कोणी सामील आहे का, याचा तपास सुरू आहे.


