रणजीत मस्के प्रतिनिधी
सातारा : शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला जेरबंद केले. त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोळाचा ओढा परिसरातील राजपुरोहित दुकानासमोर एक संशयित इसम पिस्टलसह उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयिताने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हर्षल सुनिल भोसले (वय २०, रा. आझादनगर, शाहुपुरी, सातारा) असे आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे तसेच अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे, विशाल धुमाळ यांनी पार पाडली.


