नाशिक प्रतिनिधी
राज्यात तथाकथित ‘बाबा’ आणि अंधश्रद्धेच्या आडून होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना, नाशिक जिल्ह्यातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भविष्य सांगणे, दैवी बाधा दूर करणे आणि पूजा-विधींच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका भोंदूबाबावर करण्यात आला असून, या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश गिरी असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायदा तसेच बलात्काराच्या कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) परिसरात असलेल्या एका मठातून तो कार्यरत होता. ‘प्रति गाणगापूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविकांची वर्दळ असते. याच गर्दीचा फायदा घेत आरोपी विविध कुटुंबांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे.
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्या कुटुंबीयांना ‘दैवी बाधा’ झाल्याचे सांगून पापनाशक कुंडात अंघोळ करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर काही धार्मिक विधींच्या नावाखाली झाडाभोवती फेऱ्या मारण्यासही सांगितले. या प्रक्रियेनंतर आरोपीने संबंधित महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला आणि तिला अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली.
यानंतर ‘विशेष दैवी विधी’ करण्याचा बहाणा करून आरोपीने तिला एकांतात बोलावले. पुढे नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विरोध केल्यास दैवी कोप होईल, अशी भीती दाखवत वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, “मी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने जबरदस्ती करत राक्षसासारखा अत्याचार केला. भीतीमुळे प्रतिकार करणे शक्य झाले नाही,” अशी व्यथा तिने मांडली आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, आरोपीकडून अशाच प्रकारे इतर महिलांचेदेखील शोषण झाले असण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धा, भोंदूबाबा आणि धार्मिक आडोशात होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात पुन्हा एकदा कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


