नाशिक प्रतिनिधी
राज्यभरात आणि दिल्लीपर्यंत चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवी आणि धक्कादायक माहिती समोर येत असून, पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ वाढत आहे. पोलिसांनी दिलेल्या गोपनीयतेच्या हमीमुळे पीडित महिलांचा प्रतिसाद लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येत आहे.
खरातविरुद्ध नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत लैंगिक शोषण, फसवणूक आणि दमदाटीच्या एकूण १५ गुन्ह्यांची नोंद आहे. यापैकी आठ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित असून, नऊ गंभीर गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू आहे. आर्थिक व्यवहारांबाबतही अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जात आहे.
अलीकडेच एका प्रकरणात पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, इतर गुन्ह्यांमध्ये अटक दाखल करून त्याला पुन्हा पोलिस कोठडीत घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
विशेष तपास पथकाने जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल पाचव्या गुन्ह्यातही खरातचा सहभाग उघड झाल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात पुढील चौकशीसाठी न्यायालयाने पोलिसांना कोठडीचा अधिकार दिला आहे. आतापर्यंत विविध गुन्ह्यांमध्ये त्याला ५ ते १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने पीडितांमध्ये बदनामीची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे तक्रार देण्यास महिलांनी कचरल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांनी पुढाकार घेऊन पीडितांना विश्वासात घेतले आणि त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.
या विश्वासामुळेच आता महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. विशेष हेल्पलाईनवर दररोज पाच ते सहा कॉल येत असून, मागील २० दिवसांत शेकडो तक्रारी नोंदवल्या गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तक्रारींमध्ये लैंगिक शोषणाबरोबरच आर्थिक फसवणूक, धमकावणे आणि लबाडीचे प्रकारही समोर येत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ४० जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात अधिक आक्रमक भूमिका घेतली असून, खरातला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


