नाशिक प्रतिनिधी
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘यूजी नीट’ पेपरफुटी प्रकरणाची धग आता नाशिक आणि अहिल्यानगरपर्यंत पोहोचली असून, या प्रकरणात आणखी एका संशयिताला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतल्याने तपासाला वेग आला आहे. आतापर्यंतच्या चौकशीत पेपरफुटीचे धागेदोरे नाशिक, गुरुग्राम आणि राजस्थानपर्यंत पोहोचल्याचे समोर आले असून, आगामी चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणातील प्रमुख संशयित शुभम मधुकर खैरनार (वय 27, रा. इंदिरानगर, नाशिक) याला नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित धनंजय लोखंडे हा अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. शुभम हा ‘बीएएमएस’च्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून, तो करिअर कौन्सलर म्हणूनही कार्यरत होता. शिक्षण आणि कौन्सलिंगच्या आडून त्याने लाखो रुपयांच्या व्यवहारातून पेपरफुटीचे जाळे उभे केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
कुरिअरमधून प्रश्नपत्रिका; गुरुग्राममार्गे राजस्थानपर्यंत पोहोच
राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मार्फत 2 मे रोजी ‘नीट यूजी’ परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने राजस्थानमधील एसओजी पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला.
तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभम खैरनार याने प्रश्नपत्रिकेचा संच कुरिअरद्वारे हरियाणातील गुरुग्राम येथे पाठवला होता. तेथून ही प्रश्नपत्रिका राजस्थानमध्ये पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यवहारासाठी तब्बल लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा संशय असून, पैशांच्या मागावरून CBI आता मोठे रॅकेट उघड करण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, “केवळ झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासातून” शुभमने हा प्रकार केल्याची कबुली चौकशीत दिली आहे. तपास यंत्रणांनी त्याचे मोबाईल, आर्थिक व्यवहार, सोशल मीडिया संपर्क आणि कौन्सलिंग नेटवर्कची माहिती तपासण्यास सुरुवात केली आहे.
पलायनाचा प्रयत्न; टक्कल करून देवदर्शनाच्या नावाखाली पळण्याची तयारी
CBIकडून मंगळवारी सकाळी नाशिक शहर पोलिसांना संशयिताला ताब्यात घेण्याबाबत पत्र प्राप्त झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने तातडीने तांत्रिक विश्लेषण करून शुभमचा माग काढला. गुन्हे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-दोनचे पथक सक्रिय झाले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने अवघ्या दीड तासांत संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून शुभमने पूर्ण टक्कल करून देवदर्शनासाठी बाहेर पडण्याचा बहाणा तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र पोलिसांनी त्याचा डाव उधळून लावत त्याला अटक केली.
प्राथमिक चौकशीत शुभमने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
भावाकडे गावठी पिस्तूल; खैरनार कुटुंब पुन्हा चर्चेत
दरम्यान, शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर येत आहे. मार्च 2026 मध्ये नांदगाव तालुक्यातील कोर्ट रोड परिसरातील मुक्ताई मेडिकल येथे पोलिसांनी छापा टाकून गावठी कट्टा जप्त केला होता. त्या प्रकरणात भावेश खैरनार आणि ढेब्या उर्फ रूद्राक्ष दीपक सोनवणे यांना अटक करण्यात आली होती.
भावेश हा शुभमचा लहान भाऊ असल्याची माहिती आता समोर आली आहे. पोलिस तपासात भावेशने ढेब्याकडून अवैध पिस्तूल खरेदी केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे खैरनार कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
विद्यार्थ्यांवर मानसिक ताण; जिल्ह्यातील 8,856 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा
नाशिक जिल्ह्यातील 21 केंद्रांवर 3 मे रोजी ‘नीट’ परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला जिल्ह्यातील तब्बल 8 हजार 856 विद्यार्थी बसले होते. मात्र पेपरफुटी प्रकरण उघड झाल्यानंतर NTAने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
दहावीनंतर दोन-दोन वर्षे कोचिंग क्लासेस, कठोर अभ्यास, तणावपूर्ण दिनचर्या आणि पालकांचा लाखोंचा खर्च अशा संघर्षातून विद्यार्थी जात असतात. परीक्षा संपल्यानंतर काहीसा दिलासा मिळालेल्या विद्यार्थ्यांवर आता पुन्हा अभ्यासाचा ताण येणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
शुभम खैरनारबाबत थोडक्यात…
मध्य प्रदेशातील सिहोर येथे वैद्यकीय शिक्षण सुरू
‘बीएएमएस’ तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी
करिअर कौन्सलर म्हणून कामकाज
प्रश्नपत्रिका 10 लाखांत खरेदी करून 15 लाखांत विक्री केल्याचा संशय
नाशिकमध्ये कौन्सलिंग सेंटरच्या माध्यमातून संपर्कजाळे
वडील इलेक्ट्रोपथी डॉक्टर; नांदगाव येथे क्लिनिक
आर्थिक व्यवहार आणि कॉल रेकॉर्डची CBIकडून तपासणी सुरू
CBIच्या रडारवर आणखी नावे?
या प्रकरणात अजून अनेक जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. कौन्सलिंग सेंटर, कोचिंग क्लासेस, कुरिअर नेटवर्क आणि आर्थिक व्यवहार यांची साखळी उलगडत असून, देशव्यापी रॅकेटचा संशय अधिक गडद होत आहे. पुढील काही दिवसांत आणखी अटकसत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


