मिर्झापूर,उत्तर प्रदेश:
संध्याकाळच्या सुमारास वाराणसी-रीवा महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ब्रेक फेल झालेल्या भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या बोलेरो आणि कारला चिरडत डंपरवर धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर वाहनांनी पेट घेतल्याने प्रवासी जवळपास अर्धा तास ज्वाळांमध्ये होरपळत राहिल्याची हृदयद्रावक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघात इतका भीषण होता की काही क्षणांतच तीनही वाहनांना आग लागली. ज्वाळांची तीव्रता एवढी होती की मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांना वाहनांच्या जवळ जाता आले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेक प्रवासी आगीत सापडून मृत्यूमुखी पडले.
प्रत्यक्षदर्शी विजय कुमार यांनी सांगितले की, “मोठा आवाज झाला आणि आम्ही घटनास्थळी धावलो. बोलेरो आणि कार पूर्णपणे जळत होत्या. आत अडकलेल्या लोकांचे ओरडण्याचे आवाज येत होते; मात्र आगीमुळे काहीही करता येत नव्हते. जवळपास ३० मिनिटे ते जिवंतपणी जळत होते.”
दुसरे प्रत्यक्षदर्शी गुड्डू यादव यांनीही हळहळ व्यक्त करत सांगितले की, “अग्निशमन दल १० मिनिटे आधी पोहोचले असते, तर कदाचित काहींचे प्राण वाचले असते. त्या असहाय क्षणांचा आक्रोश आयुष्यभर विसरता येणार नाही.”
या दुर्घटनेत जिगना येथील एका कुटुंबाचा मोठा बळी गेला. धार्मिक विधीसाठी मैहर येथे गेलेले हे कुटुंब परतीच्या प्रवासात होते. बोलेरोमधील प्रियांका (४२), कार्तिकेय (१८), पियुष (१४), पंकज (४०), बिना (४७), वंदना (४३) यांच्यासह दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर वाहनांचा केवळ लोखंडी सांगाडा उरला होता. पोलिसांनी तुटलेल्या नंबर प्लेटच्या आधारे मृतांची ओळख पटवली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला.
जिल्हा पोलिस अधीक्षक रजत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही दुर्घटना घडली. या अपघातात बोलेरोमधील आठ जण, दोन कार चालक आणि ट्रकचा क्लिनर अशा एकूण ११ जणांचा मृत्यू झाला. ट्रक चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे.


