कानपूर प्रतिनिधी
कानपूरमध्ये हवाला आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचे जाळे उघडकीस आणताना क्राइम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे धनकुट्टी परिसरातील दाट वस्तीतील एका घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी सुमारे दोन कोटी रुपयांची रोकड आणि ६१ किलो चांदी जप्त केली. जप्त चांदीची बाजारभावानुसार किंमतही सुमारे दोन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात नेपाळी चलनही सापडल्याने व्यवहारांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या छापेमारीदरम्यान पोलिसांनी चौघांना अटक केली असून, संबंधित घर गुप्ता नावाच्या व्यक्तीचे असल्याची माहिती पुढे आली आहे. कारवाईची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रघुवीर लाल आणि सहआयुक्त विनोद कुमार यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी सुमित सुधाकर रामटेके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ही कारवाई विश्वासार्ह गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. “घरातून मोठ्या प्रमाणावर रोकड, चांदी आणि परकीय चलन जप्त झाले आहे. प्राथमिक तपासात हे संघटित रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले असून, आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे,” असे ते म्हणाले.
हवाला आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका पोहोचवतातच, शिवाय दहशतवाद, तस्करीसारख्या गुन्हेगारी कारवायांना आर्थिक पाठबळ देतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नेपाळी चलनाच्या जप्तीमुळे हे नेटवर्क सीमापार व्यवहारांशी जोडलेले असण्याची दाट शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींची बँक खाती, मोबाईल डेटा आणि मालमत्तांची सखोल चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर शहरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे. तपासात आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून, येत्या काळात आणखी छापेमाऱ्या होऊ शकतात, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


