सुधाकर नाडत प्रतिनिधी
अन्टॉप हिल परिसरात ट्रॅफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी गुन्हेगारी घटना टळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन पोलिस जवानांच्या धाडसाने पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह दोन संशयितांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे.
अन्टॉप हिल मोनो रेल्वे स्थानकाजवळ हेड कॉन्स्टेबल प्रभाकर पवार आणि पोलिस कॉन्स्टेबल शरद आवाड हे नियमित गस्त घालत होते. याच वेळी काळ्या काचांची फिल्म लावलेली एक संशयास्पद कार त्यांच्या नजरेस पडली. पोलिसांना पाहताच संबंधित वाहनचालकाने कार वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. संशय बळावल्याने पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला.
सुमारे ५०० मीटर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी कार अडवण्यात यश मिळवले. चौकशीदरम्यान कारमधील दोन जणांनी खाली उतरून रस्त्याच्या कडेला काही वस्तू फेकून देत दूर जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ ती वस्तू ताब्यात घेतली असता त्यामध्ये एक पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे आढळून आली.
या घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनीष आवाले यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून संबंधित कारही जप्त करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे पुणे येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे आरोपी मुंबईत शस्त्रास्त्रांसह कोणत्या उद्देशाने आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. संभाव्य मोठी गुन्हेगारी घटना किंवा सुपारी किलिंगचा कट होता का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त देवन भारती यांच्या हस्ते या धाडसी कामगिरीबद्दल संबंधित ट्रॅफिक पोलिसांचा गौरव करण्यात येण्याची शक्यता आहे.


