मुंबई प्रतिनिधी
आखाती भागातील तणाव आणि त्याचा ऊर्जा पुरवठ्यावर झालेला परिणाम लक्षात घेता देशात एलपीजीच्या उपलब्धतेवर दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (DAC) प्रणाली सक्तीची केली आहे. गॅस बुकिंगपासून ते प्रत्यक्ष डिलिव्हरीपर्यंत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा मानला जात आहे.
अलीकडच्या काळात अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. बुकिंग झाल्यानंतरही सिलिंडर वेळेत न मिळणे, बनावट डिलिव्हरी दाखवून ग्राहकांची फसवणूक होणे, अशा तक्रारींमध्ये वाढ झाली होती. यावर तोडगा म्हणून डीएसी प्रणाली अधिक प्रभावीपणे लागू करण्यात आली आहे. सध्या देशातील सुमारे ९२ टक्के गॅस वितरण या प्रणालीद्वारे होत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
‘डीएसी’ म्हणजे काय?
डीएसी (Delivery Authentication Code) हा प्रत्येक बुकिंगनंतर ग्राहकाला दिला जाणारा एक अद्वितीय कोड आहे. ओटीपीप्रमाणेच हा कोड असतो. सिलिंडरची डिलिव्हरी देताना ग्राहकाने हा कोड सांगितल्याशिवाय वितरण पूर्ण होणार नाही. त्यामुळे बनावट डिलिव्हरी किंवा एजन्सी स्तरावर होणारी फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.
कसा मिळेल डीएसी?
ग्राहकांनी गॅस एजन्सीच्या अधिकृत क्रमांकावर कॉल, IVRS, एसएमएस किंवा अधिकृत संकेतस्थळाद्वारे सिलिंडर बुक करावा. बुकिंग निश्चित झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर डीएसी कोड पाठवला जातो. नवीन सुधारणांनुसार हा कोड आता व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवरही उपलब्ध होणार आहे.
डिलिव्हरीच्या वेळी हा कोड संबंधित कर्मचाऱ्याला सांगणे बंधनकारक असेल. कोड नसल्यास सिलिंडर देण्यात येणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणींवर उपाय
पूर्वी बुकिंग करूनही अनेक ग्राहकांना डीएसी कोड मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. विशेषतः नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदललेला असल्यास किंवा नेटवर्क अडचणीमुळे कोड न मिळण्याच्या घटना घडत होत्या. मार्च महिन्यातील अहवालानंतर या प्रणालीतील त्रुटी दूर करण्यात आल्या असून, आता विविध माध्यमांतून (एसएमएस, व्हॉट्सॲप, ई-मेल) कोड पाठवण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
ग्राहकांसाठी सूचना
डीएसी कोड गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. तो फक्त डिलिव्हरी कर्मचाऱ्यालाच द्यावा. इतर कोणाशीही कोड शेअर केल्यास फसवणुकीचा धोका संभवतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
ऊर्जा पुरवठ्यावर जागतिक घडामोडींचा परिणाम होत असतानाच वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टीने डीएसी प्रणाली महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही या नव्या नियमांचे पालन करून सुरक्षित व्यवहार करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.


