मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईती ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या सुरू असून, त्यांचा नियोजित बारामती दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांना नियमित तपासणी तसेच काही आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “सध्या त्यांच्या विविध चाचण्या सुरू आहेत. अहवाल आल्यानंतरच प्रकृतीबाबत अधिक स्पष्ट माहिती देता येईल,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे सध्याच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती अहवालानंतरच समोर येणार आहे.
दरम्यान, मागील महिन्यातही पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, अल्पावधीतच पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या वयाचा आणि अलीकडील प्रकृतीचा विचार करून केवळ खबरदारी म्हणूनच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जाते. सध्या सुरू असलेल्या तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचारपद्धती किंवा डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
पवार यांच्या प्रकृतीविषयीची अधिकृत माहिती समोर येईपर्यंत राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबईकडे लागले असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.


