नांदेड प्रतिनिधी
शहरात अलीकडच्या काळात घरफोड्यांच्या घटनांनी धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात भाग्यनगर गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलासह पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीत दहा घरफोडींचा उलगडा झाला आहे. आरोपींकडून सुमारे ७८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फरांदे नगर परिसरात काही दिवसांपूर्वी चोरी करून पळणाऱ्या संशयितांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. या व्हिडिओची दखल घेत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, डम्प डेटा आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) यांच्या साहाय्याने संशयितांचा माग काढण्यात आला.
बाबानगर परिसरात सापळा रचून सोहेल अब्दुल सत्तार, प्रदीपकुमार कौरी आणि एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी भाग्यनगर, शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहा ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरीचा माल अर्जुन मोरे, शेख नईम आणि आशा तेलंग यांना विकल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांकडून मुद्देमाल जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये ४४.५ तोळे सोने (६८.८० लाख रुपये), १७१.४ तोळे चांदी (४.५४ लाख रुपये) तसेच एक कार व तीन दुचाकी (५ लाख रुपये) यांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख करीत असून, या टोळीशी संबंधित आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या कारवाईत निरीक्षक संतोष तांबे, महेश माळी, उपनिरीक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, विशाल माळवे, केळगंद्रे, विष्णूकांत मुंडे, सुधाकर मलदोडे, राहुल लाठकर, नागनाथ चापके, राजीव घुले, अदनान पठाण, अंकुश कांबळे तसेच सायबर सेलचे अधिकारी सहभागी होते.


