पुणे प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेकडून शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली असून, गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. विविध जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन आणि जलसाठा टाक्यांवरील तातडीच्या दुरुस्ती व देखभाल कामांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानुसार, बुधवार मध्यरात्री १२ वाजल्यापासून (२३ एप्रिलची सुरुवात) ते गुरुवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण शहरात पाणीपुरवठा खंडित राहील. या कालावधीत पर्वती येथील जुने व नवे जलशुद्धीकरण केंद्र, वडगाव, वारजे, लष्कर जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, भामा आसखेड जलकेंद्र तसेच खडकवासला जॅकवेल येथे विविध तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत.
या दुरुस्तीमुळे शहरातील बहुतांश भागांवर पाणीटंचाईचे सावट राहणार आहे. मध्यवर्ती पेठ क्षेत्रांसह शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट, कॅम्प, सहकारनगर, बिबवेवाडी, कात्रज, धायरी, हडपसर, मुंढवा, खराडी, कोथरूड, औंध, बाणेर, बालेवाडी, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, कोंढवा आदी भागांचा यात समावेश आहे. तसेच नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या उपनगरांनाही या बंदचा फटका बसणार आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, शुक्रवार (२४ एप्रिल) रोजी पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू होईल; मात्र सुरुवातीला कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विभागनिहाय परिणाम
मध्य पुणे व पेठ क्षेत्रे (पर्वती एमएलआर/एलएलआर टाक्या):
गुरुवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर आदी भाग पूर्णपणे प्रभावित.
दक्षिण पुणे (पर्वती एचएलआर, वडगाव व राजीव गांधी पंपिंग):
सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, कोंढवा, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, धायरी व परिसर.
पूर्व पुणे व कॅन्टोन्मेंट (लष्कर व खराडी पंपिंग):
कॅम्प, ससून परिसर, खराडी, चंदननगर, हडपसर, मुंढवा, मगरपट्टा, कोरेगाव पार्क, फुरसुंगी, उरुळी देवाची आदी भाग.
पश्चिम पुणे (वारजे व एसएनडीटी टाक्या):
कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, पाषाण, बाणेर, बालेवाडी, एरंडवणे, सेनापती बापट रोड परिसर.
उत्तर पुणे व नगर रस्ता (चतुश्रृंगी व भामा आसखेड):
औंध, बोपोडी, खडकी, विद्यापीठ परिसर, विमाननगर, लोहेगाव, कल्याणीनगर, विश्रांतवाडी आदी भाग.
नवीन समाविष्ट गावे (बूस्टर पंपिंग):
खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, शिवणे, धायरी व डीएसके विश्व परिसर.
पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, “शहराच्या दीर्घकालीन पाणी व्यवस्थेसाठी ही कामे अत्यावश्यक आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे व पाण्याचा योग्य वापर करावा.”
दरम्यान, अचानक होणाऱ्या या बंदमुळे नागरिकांनी पूर्वतयारी करणे गरजेचे असून, विशेषतः रुग्णालये, हॉटेल्स, गृहनिर्माण सोसायट्या व व्यावसायिक आस्थापनांनी पर्यायी व्यवस्था ठेवावी, अशी सूचनाही प्रशासनाने दिली आहे.


