पुणे प्रतिनिधी
शहरातील खडकी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुरू असलेल्या उत्सवी वातावरणात एक धक्कादायक प्रकार समोर आला. वैवाहिक वादातून विभक्त राहणाऱ्या पत्नीवर पतीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
राहुल महादेव कांबळे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, सायली सयाजी भिसे (वय २२) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सायली भिसे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायली आणि राहुल यांचा काही महिन्यांपूर्वी आळंदी येथे विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने ते काही काळापासून विभक्त राहत होते. त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.
दरम्यान, १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात आयोजित कार्यक्रमाला सायली आपल्या मैत्रिणीसह उपस्थित होती. कार्यक्रम आटोपून त्या रात्री सुमारे ११.४५ वाजता घरी परतत असताना आरोपी राहुल कांबळे अचानक त्यांच्या समोर आला.
यावेळी त्याने सायली यांच्याशी वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. सायली यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने चाकूसदृश धारदार हत्याराने त्यांच्या कपाळ, गाल, खांदा, पाठ तसेच ओठाखाली वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
सायली भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली असून आरोपीला काहींचा पाठिंबा असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.


